हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात पूर्णा नदीवरून जाणाऱ्या औरंगाबाद – नांदेड राष्ट्रीय महामार्गावर हिंगोलीकडे ऑक्सिजन घेऊन जाणारा एक टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. तर, टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली व जवळपास दोन तास वाहतूक देखील ठप्प झाली होती.

अखेर, दोन तास चालेल्या दुरुस्ती कामानंतर हा टँकर हिंगोलीकडे रवाना करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. टँकर उलटल्यानंतर यामध्ये गॅस असल्याच्या अफवेने नागरिक व अन्य वाहनचालक घाबरले होते. परंतु वाहन चालकाने यात ऑक्सिजन असल्याची माहिती दिल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर, खोळंबलेली वाहतूक पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सुरळीत झाली.

औंढा  नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीवरून औरंगाबाद- नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग जातो. पूर्णा नदीवरील पूल अरुंद असल्याने औरंगाबाद येथून हिंगोलीसाठी ऑक्सिजन टँकर घेऊन जाणाऱ्या चालकाला त्याचा अंदाज आला नाही व अचानक त्याचे नियंत्रण सुटल्याने हे १६ टायरचा हा भव्य टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.  दरम्यान, चालक व इतर दोघांनी टँकरमधून उड्या मारून जीव वाचवला. परंतु टँकरमधील ऑक्सिजन मोठ्याप्रमाणावर लीक झाला. अखेर दोन तासाच्या प्रयत्नानंतर ऑक्सिजन गळती बंद झाली. यानंतर क्रेनच्या सहायाने उलटलेला टँकर सरळ करण्यात आला व हिंगोलीकडे रवाना करण्यात आला.

याबाबत तहसीलदार कृष्णा कानगुले यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुढे, सहायक पोलीस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, लांडगे, गणेश पवार हे दाखल झाले होते.