करोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची २० हजार रुपयांना विक्री करणारी सात जणांची टोळी गुन्हे शाखेने जेरबंद केली. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहानजीक मंगळवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त रवींद्र काळोखे यांनी दिली.

दिनेश कान्हू नवगिरे, साईनाथ अण्णा वाहूळ, रवी रोहिदास डोंगरे (रा. औरंगाबाद), संदीप सुकदेव रगडे, प्रवीण शिवनाथ बोर्डे, नरेंद्र मुरलीधर साबळे व अफरोज इकबाल खान (रा. बदनापूर जि. जालना), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून मायलॉन, कोविफोर व रेमडॅक कंपनीचे पाच रेमडेसिविर इंजेक्शन, ५५ हजारांचे मोबाईल फोन व एक दुचाकी, असा ५ लाख ७४ हजार ५८७ रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे निरीक्षक राजगोपाल मुलचंद बजाज यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी दिनेश नवगिरे हा जालन्याच्या बदनापूर येथील मित्रांशी संपर्क साधून अवैधरीत्या रेमडेसिविर इंजेक्शनची मोबाईल फोनवरून मागणी करून त्याची डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय २० हजार रूपयांना विक्री करायचा. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधला. गुन्हे शाखेचे विशाल पाटील यांनी दिनेश नवगिरे याच्याकडे बनावट ग्राहक पाठवला. या बनावट ग्राहकाने दिनेशला २० हजार रुपये मोबाईल फोनवरून पाठवले. घाटी परिसरातून इंजेक्शन मिळणार असल्याचे बनावट ग्राहकाला सांगण्यात आले. तेथील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळ बनावट ग्राहकाला इंजेक्शन देताना दिनेशला पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता वरील आरोपी मित्रांची नावे सांगितली.