शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीला औरंगाबाद पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीने आतापर्यंत सोलापूर, बीड, अहमदनगर, जालना, पुणे, चाकण यासारख्या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यातील एक आरोपी हा खुनाच्या गुन्ह्यातला गुन्हेगार असल्याचंही तपासात समोर आलं आहे. अंबड तालुक्यातील भारडी गावात ही टोळी आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या टोळीतील मुख्य आरोपी विष्णु खणसे हा जालना जिल्ह्याचा रहिवासी असून तो पुण्यात एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. एका कामानिमीत्ताने विष्णुची ओळख खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या राहुल गायकवाडशी झाली. यानंतर विष्णुने कंपनीतील दुर्गेश नवघरे, माऊली उडाण, शेख वासिम आणि आणखी एका मुलाला सोबत घेऊन टोळी तयार केली. गुन्हा करण्यासाठी ही टोळी कोयत्याचा धाक दाखवून प्रवाशांना लुटायला लागली.

६ फेब्रुवारी रोजी जगदीशसिंह दीक्षित हे रात्री आठच्या सुमारास जालन्याहून औरंगाबादच्या दिशेने टाटा मॅजिकमध्ये प्रवास करत होते. यावेळी त्यांना तीन ते चार जणांनी कवडगाव येथे गाठले. यावेळी विष्णुच्या टोळीने दीक्षित यांना मध्येच गाठत एक प्रवासी सोबत घेऊन जायचा आहे असं कारण सांगत लिफ्ट घेतली. काही अंतरावर गेल्यानंतर या टोळीने दीक्षित यांना कोयत्याने मारहाण करुन त्यांच्याजवळून चौदा हजारांची रोकड आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर सहा दिवसांनीच या टोळीने श्रीराम वाळके या इसमाला अशाच पद्धतीने मारहाण करत त्याची कार लांबवली.

काही महिन्यांनी या टोळीने लुटीच्या पैशातून नवीन कार विकत घेतली. ही टोळी बनावट नंबर प्लेट लावून ही टोळी कारचा वापर लुटमार करण्यासाठी करु लागली. अंबड तालुक्यात भारडी येथे आलेले असताना पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला. मिळालेल्या माहितीवरुन कारवाई करत पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, सहायक फौजदार गणेश जाधव, जमादार विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, संजय काळे, सागर पाटील, गणेश गांगवे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय भोसले यांच्या पथकाने टोळीच्या मुसक्या आवळल्या.