आरेमधील मेट्रोच्या कारशेडसाठी तोडण्यात आलेल्या झाडांना शिवसेनेनं मोठा विरोध केला होता. त्यातच आता औरंगाबादमध्ये होणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तब्बल ५ हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. प्रियदर्शनी उद्यान परिसरातील झाडं कापली जात असताना मात्र शिवसेनेकडून मौन बाळगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आरेमधील झाडांच्या कत्तलीला शिवसेनेनं विरोध केला असतानाच तोच न्याय औरंगाबादमधील प्रियदर्शनी उद्यानाला मिळणार का असा सवाल आता पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रियदर्शनी उद्यानात ७० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी, ४० प्रकारची फुलपाखरे आणि अन्य जीव आढळतात. या उद्यानाची जागा यापूर्वी सिडकोच्या ताब्यात होती. परंतु कालांतरानं ती मनपाच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर या उद्यानातील ४४३ झाडं तोडण्यात आली आहेत. याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे.

या उद्यानात हे स्मारक उभारायचे असल्यास त्यासाठी ५ हजार झाडांची कत्ताल करावी लागणार असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. तसंच या विरोधात ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातूनही आंदोलन उभारण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एकूण ६४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात स्मारक उभारण्यासाठी १ हजार १३५ चौरस मीटर, फुड पार्कसाठी २ हजार २२० मीटर, म्युझिअमसाठी २ हजार ६०० चौरस मीटर तर ३ हजार ६९० चौरस मीटर उघडी जागा असणार आहे. आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार असा सवाल सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad priyadarshani garden 5 thousand tree cut for shiv sena chief balasaheb thackeray monument jud
First published on: 07-12-2019 at 10:26 IST