तीन-चार किरकोळ घटनांचे पर्यवसान दोन गटांतील हाणामारीपर्यंत गेले आणि औरंगाबाद शहर पेटले. मोती कारंजा भागातून सुरू झालेली दंगल जुन्या शहरात पसरली. दगडफेक, दुकाने आणि वाहनांना आगी लावण्याचे प्रकार यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले. दरम्यान, या घटनेत औरंगाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. गोवर्धन कोळेकर यांच्यावर औरंगाबादेतील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. जमावाला पांगवण्यासाठी ते स्वतः पुढे गेले तेव्हा एक दगड त्यांच्या गळ्याला लागला. ज्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाल्याची माहिती औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी दिली. डॉक्टरांनीही कोळेकर यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले आहे.

धाडसी पोलीस अधिकारी म्हणून कोळेकर यांची ख्याती आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणाचे पडसाद औरंगाबाद शहरात उमटले होते. त्यावेळीही जमावाला पांगवण्यासाठी ते स्वत: पुढे गेले होते. त्यावेळीही त्यांना दगड लागला होता.

औरंगाबादमधील या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ५० जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. औरंगाबादेत मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली होती.