मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करताना एकाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मारहाण केली. ही घटना गुरूवारी सकाळी औरंगाबाद येथील क्रांती चौकात घडली. आरक्षणाची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारविरोधात घोषणा दिली जात होती. त्यावेळी एका आंदोलकाने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरत घोषणा दिली. त्यामुळे दानवेंनी त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, दानवे यांनी आपण मारहाण केली नसून फक्त त्या व्यक्तीच्या दिशेने धावून गेल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, दानवेंनी यांनी आपण फक्त त्या व्यक्तीच्या अंगावर धावून गेल्याचे म्हटले. मी सुरूवातीपासून या आंदोलनात सक्रीय आहे. प्रत्येक आंदोलनात मी सहभागी होतो. उद्धव ठाकरे हे माझे नेते आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे मी सहन करणार नाही. मी त्या व्यक्तीला सुरूवातीला समजावून सांगितले. पण त्याने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरले. त्यामुळे मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, असे म्हणत त्यांनी आपल्या कृत्याचे समर्थनही केले.

आयोजकांनी राजकारण्यांना आंदोलनस्थळावरून जाण्यास सांगितल्यानंतरही दानवे तिथे थांबले होते. अखेरीस पोलिसांनी त्यांना तेथून जाण्याची विनंती केल्यानंतर दानवे निघून गेले.