राज्याची पर्यटन राजधानी औरंगाबादमध्ये दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी सकाळी औरंगाबादमधील वाळूज भागातील बजाज कंपनीत ७९ कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत. एकाचवेळी इतके कर्मचारी करोनाबाधित आढळल्यामुळे कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर बजाज कंपनीकडून दोन दिवस कंपनी बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवारी कंपनी बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे.

बजाज कंपनीचे कामकाज पुढील दोन दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले. सोमवारीही कमी कर्मचाऱ्यांना बोलावले जाईल, असे बजाज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बजाजनगर मध्ये गेल्या काही दिवसापासून रुग्ण संख्या वाढत होती त्यामुळे प्रशासनही हैरान होते. रुग्ण संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पाहणी केली होती. शुक्रवारी ते बजाज नगर भागातच दौर्‍यावर होते.

लॉकडाउन शिथील झाल्यानंतर काही रुग्ण आढळून येत होते. मात्र, कंपनीमध्ये विषाणूचा प्रसार नक्की कुठून सुरू झाला हे सांगता येत नाही. श्रीलंका,पेरू, दक्षिण आफ्रिकेतील काही देशांमध्ये दुचाकींची मागणी असल्यामुळे उत्पादन क्षमतेच्या ६० टक्‍क्‍यांपर्यंत कामकाज सुरू करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींना करोनख लागण होत असल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने बजाज कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कैलास झांजरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी आता कामकाज होणार नाही. निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया एरवीदेखील आम्ही करत होतो. आता पुन्हा संपूर्ण कंपनीचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. यानंतर कंपनीचे कामकाज सुरू करतानाही कमीत कमी कर्मचारी बोलवले जातील. नक्की किती जणांना करोना बाधा झाली याचा आकडा हाती उपलब्ध नसल्याचे झांजरी म्हणाले.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज, शुक्रवारी सकाळी १९३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४४९२ झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी १०२ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ९१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी २२९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २३२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १९६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.