महापौर पदापासून ते खासदारापर्यंत औरंगाबाद शहरात शिवसेनेचा बोलबाला आहे. पालिकेवर तर गेल्या 25 ते 30 वर्षापासून सेनेचा भगवा फडकतोय, असं असताना औरंगाबाद महानगरपालिकेला बाळासाहेब ठाकरेंचा विसर पडलाय. त्या पाठीमागचं कारण म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महानगरपालिकेत सुरू असलेल्या योजनेला आणि शहरातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी पालिकेच्या आर्थसंकल्पात एक रुपयांची तरतूद केलेली नाही. शिवसनेचा महापौर असताना बाळासाहेबांचा विसर पडल्याने नवल व्यक्त केलं जातं आहे.

पालिकेकडून बाळासाहेब ठाकरे अंत्यविधी योजना सुरू करण्यात आली होती. गरीब नागरिकांवर या योजने अंतर्गत अत्यसंस्कार केले जात होते. त्यासाठीच्या खर्च पालिकेच्या तिजोरीतून केला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून निधी अभावी ही योजना बासनात गुंडाळली गेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात आर्थसंकल्पात त्यासाठी कसलीही तरतूद करण्यात आलेली नाही तसेच शहरात बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक प्रस्तावित आहे.

त्यासाठीची जागा निश्चिती करण्यात आली आहे. परंतु स्मारकासाठी होणाऱ्या खर्चात पालिकेचा जो वाटा असणार आहे. त्यासाठी सुद्धा निधी ठेवण्यात आलेला नाही. पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना असा प्रकार घडल्याने नवल व्यक्त केलं जातं आहे.

महिनाभराच्या उशिराने महानगरपालिकेचं 2017-18 चं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आलं. एकूण 1274 कोटी 70 लाखांच अंदाजपत्रक असून 16 लाख 77 हजार शिल्लक दाखवण्यात आली आहे. पालिकेचं उत्पादन आणि खर्च याचा तपशील दिला. प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम यांनी हे अंदाजपत्रक सादर केलं. अंदाजपत्र पाहिल्यानंतर त्यावर अभ्यास करण्यासाठी सदस्यांनी वेळ मागितला. पुढील बैठकीत तो मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात स्थाई समितीचे सभापती गजानन बारवाल यांना विचारलं असता, बाळासाहेब ठाकरे अंत्यविधी योजना आणि बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या निधी संदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांचं पत्र मिळालं आहे. त्यासाठी अंतिम अर्थसंकल्पात योग्य निधीची तरतूद केली जाईल,असं त्यांनी सांगितलं.