औरंगाबाद शहराच्या कचरा प्रश्नावरून महानगरपालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची उचलबांगडी करण्यात आली. तर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. मात्र शहराचा कचरा प्रश्न हा खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळेच पेटला असल्याची टीका भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केली. शिवसेना आमदार संजय शिरसाट त्यांच्या मतदार संघात कचरा टाकायला नको म्हणतात. मग त्यांच्या कचऱ्याची त्यांनी सोय लावायला हवी असं तनवाणी म्हणाले. भाजप स्थापना दिनाच्या मेळाव्याच्या तयारीसाठी आज औरंगाबादमध्ये बैठक घेण्यात येत आहे. त्या बैठकीच्या अगोदर तनवाणी पत्रकारांशी बोलत होते.

नारेगाव कचरा डेपोवर गेल्या 30 वर्षांपासून कचरा टाकण्यात येत होता. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून दिवाळीच्या तोंडावर पंचक्रोशीतील नागरिकांनी आंदोलन केलं. त्यात विधासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करत चार महिन्यांची मुदत घेतली. मात्र पालिकेकडे निधी नसल्यानं काहीही हालचाली झाल्या नाहीत. सध्या निधी उपलब्ध झाला होता. पुन्हा नारेगाव परिसरातील नागरिकांकडून वेळ मागून घायची होती. मात्र खैरेंनी आंदोलकांना प्रेमाने बोलण्यापेक्षा आम्ही कचरा टाकणारच अशी भाषा केली. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झालं. भाजप राजकारण करत असल्याचा आरोप खैरे करतात, मात्र तो चुकीचा आहे. गेल्या तीस वर्षांपासून नारेगाव भागात भाजपचा आमदार असताना देखील कचरा टाकला जात होता असं तनवाणी यांनी सांगितलं.
नारेगाव येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली नाही. त्यामुळे आता शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा टाकण्यास

विरोध करत आहेत. मीटमीटा परिसरात कचरा टाकताना माझ्या मतदार संघात कचरा टाकायला नको अशी भूमिका शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी घेतली. कचरा हा शहराचा प्रश्न आहे. असं मतदार संघात त्याचं वर्गीकरण करता येत नाही. त्यांनी आता त्यांच्या कचऱ्याच व्हिलेवाट लावावी. आता तर एका जागी कचरा डंप करायचा नाही असे आदेश सरकारनं दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर यंत्र सामुग्री खरेदी करून प्रक्रिया सुरू करावी. प्रक्रिया मशीन बसल्यानंतर नागरिकांचा विरोध कमी होईल असं तनवाणी म्हणाले. सध्या शहरात अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्याची दुर्गंधी पसरली आहे. आज प्रशासकीय पातळीवर शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यात पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी देखील सहभाग नोंदवला होता.