करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सॅनिटायझर डोम आणि संपर्कमुक्त स्वॅब नमुना गोळा करणाऱ्या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, तसेच डॉक्टर, नर्सेस आणि इतरांना संसर्ग होऊ  नये म्हणून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर डोम उभारण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना येथील हेल्पिंग हँड्सचे कार्यकर्ते संजय वैशंपायन यांनी सांगितले की, या स्वयंचलित डोमला सेन्सर बसवण्यात आलेले आहेत. येथे व्यक्ती येताच निर्जंतुकीकरण द्रावणाचा फवारा सुरू होतो. तो या दोन मीटरच्या कक्षातून बाहेर पडेपर्यंत सुरू राहतो, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे निर्जंतुकीकरण शक्य होत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले की, सर्वसाधारण निर्जंतुकीकरणास  साबणयुक्त पाणी पुरेसे आहे. त्याचा या डोमला अविरत पुरवठा व्हावा याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.

यासोबतच संशयित रुग्णांच्या घशाचा द्राव (स्वॅब) तपासणीसाठी घेतला जातो. त्या ठिकाणी एका काचेच्या बंदिस्त केबिनबाहेर रबरी ग्लोव्हजच्या आधारे तपासणी नमुना गोळा करता येईल. अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या ठिकाणी नमुना घेतल्यानंतर लगेच जंतुनाशक फवारणी करण्यात येते. आतील बाजूस नमुना गोळा करणाऱ्या डॉक्टरांना संसर्ग होऊ  नये म्हणून याच्या काचा सिलिकॉनने बंदिस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात.