उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी कोल्हापूरमध्ये अवनी संस्थेच्या महिलांनी महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा प्रवेश केला. पण इतर स्थानिक महिलांनी त्यांना धक्काबुक्की करत मंदिराच्या आवारातून बाहेर काढले. यावेळी आंदोलनकर्त्या महिला विरुद्ध स्थानिक महिला असे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशानंतरही कोल्हापूरमधील पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात बघ्याची भूमिका घेतली. मंदिरात मिळालेल्या वागणुकीबद्दल अवनी संस्थेच्या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणी लिंगभेद करता येणार नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही प्रवेश दिला जावा, असे आदेश गेल्या आठवड्यातच मुंबई उच्च न्यायालयाने दिले. राज्य सरकारनेही धार्मिक ठिकाणी पुरूष आणि महिलांना समान संधी दिली जाईल, असे न्यायालयात सांगितले होते. त्यानंतरही कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. अवनी संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली काही महिलांनी वेगवेगळ्या वेशभूषेत मंदिरामध्ये प्रवेश केला. यावेळी मंदिराच्या बाहेरच काही महिलांनी त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. अवनी संस्थेच्या महिलांकडून विविध घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. गाभाऱ्याबाहेर पितळी उंबऱ्यापासून आत जाण्यास श्रीपूजकांनी आणि इतर महिलांनी या महिलांना रोखले. तसेच त्यांना धक्काबुक्की करत मंदिरातून बाहेर काढण्यात आले. हा प्रकार सुरू असताना मंदिराच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि पुरूष या दोघांनीही गाभाऱ्याबाहेरील पितळी उंबऱ्याजवळूनच महालक्ष्मीचे दर्शन घ्यावे, असा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. केवळ राजघराण्यातील व्यक्तींनाच गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळेच अवनी संस्थेच्या महिलांना अडविण्यात आल्याचे समजते.