राज्यात पावसाला चांगली सुरुवात झाली असून, जुलै महिन्यातील सरासरीच्या ६१ टक्के पाऊस (३५८ मिमी) आजपर्यंत झाला आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ५८ टक्के होता.
राज्यातील नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ या १० जिल्ह्यांत २६ ते ५० टक्के, ठाणे, रायगड, नंदूरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या १३ जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, वर्धा, नागपूर, गोंदिया या ८ जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के आणि सांगली व अमरावती या दोन जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
धरणात ४२ टक्के पाणीसाठा
राज्यातील जलाशयात ४२ टक्के साठा असून, गेल्या वर्षी याच सुमारास ५८ टक्के पाणी साठा होता. मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांत केवळ १५ टक्के पाणीसाठा असून कोकणातील प्रकल्पांत ७६, नागपूर ६४ अमरावती ४५, नाशिक २६ आणि पुणे ४६ टक्के असा पाणीसाठा आहे. राज्यात १६९५ टँकर्सद्वारे १४४५ गावांना आणि ३६४० वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
पेरणी ६२ टक्के
राज्यातील खरीपाचे सरासरी क्षेत्र १३४.७० लाख हेक्टर असून २८ जुलैपर्यंत ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.