कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेवरून गतवर्षी पायउतार झालेल्या अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ आणि अधिकारी अशा ७० जणांच्या २०११ ते १५ या कालावधीतील कारभाराची चौकशी करण्याचे आदेश पुणे प्रादेशिक सहकारी साखर संचालकांनी दिले आहेत. अविनाश मोहिते कारखान्याचे अध्यक्ष असताना कारखान्यात झालेल्या अवाजवी खर्चाची तक्रार घेऊन अभिजित पाटील यांच्यासह काही सभासदांनी दाद मागितली होती. दरम्यान आम्ही कसलेही चुकीचे काम केले नसून, कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत असे स्पष्टीकरण अविनाश मोहिते यांनी दिले.

दरम्यान, परदेशी यांनी केलेल्या चौकशीत अनावश्यक खर्च, जादाची नोकरभरती व त्यावर झालेला खर्च, वाहतूक भाडय़ावरील अवाजवी खर्च, कंत्राटी कामगार आणि मजुरांवरील खर्च, जादा दराने झालेली खरेदी, देशी दारू विक्रीतील त्रुटी, चुकीच्या पद्धतीने झालेल्या ऊसनोंदी, वसुलीतील कुचराई आदी मुद्दे समोर आले आहेत. या पाश्र्वभूमीवर ही चौकशी होणार आहे. साखर संचालकांचे प्राधिकृत अधिकारी श्या. ग. परदेशी यांनी या प्रकरणी संबंधित ७० जणांना नोटीस बजावली असून, या सर्वाना १२ जुलै रोजी आपले म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्यास सुचविले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम १९६०मधील कलम ८३ अंतर्गत ही चौकशी होत असून, सध्या कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रासह सहकारी साखर कारखाना क्षेत्रात हा विषय चर्चेचा बनला आहे.

या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना अविनाश मोहिते यांनी आपल्याकडून स्वच्छ कारभार झाल्याचा निर्वाळा देताना, विद्यमान संचालक मंडळावर टीका केली. ते म्हणाले, की राजकीय हेतूनेच ७० जणांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. आम्ही कसलेही चुकीचे काम केले नसून, कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत.