पांढरकवड्यातील ‘अवनी’ (टी-१) या पाच वर्षांच्या वाघिणीला ठार करण्यात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचा एक सुविचार ट्विटरवर शेअर केला आहे. ‘देशात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुन देशाची महानता ठरते’, हा सुविचार ट्विटर करत त्यांनी सरकारला फटकारलं आहे.

गेल्या दोन वर्षांत १३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पांढरकवड्यातील ‘टी- १’ या पाच वर्षांच्या वाघिणीला जेरबंद करण्याचे वनखात्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर अखेर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. मात्र, यावरुन वाद निर्माण झाला आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनी यावर कारवाईवर आक्षेप घेतला. इतकंच नव्हे तर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी देखील अवनी वाघिणीला ठार मारल्याच्या घटनेवरुन टीका केली होती.

आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर सोमवारी सकाळी एक ट्विट केले आहे. त्यांनी महात्मा गांधी यांचा सुविचार ट्विट केला आहे. ”देशात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुन देशाची महानता ठरते, असं महात्मा गांधींनी म्हटले होते’, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. मनेका गांधींनी केलेली टीका माहितीच्या अभावी असून वाघिणीला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाही. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शिकेनुसार याबाबत निर्णय घेतल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.