अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन काँग्रेसने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुनगंटीवार हे प्राण्यांच्या हत्येसाठी ओळखले जातात. ते शिकार करणाऱ्या माफियांच्या टोळीत सामील असावेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

अवनी वाघिणीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले. राज्यात भाजपाचे सरकार येताच २०१५ मध्ये चौदा वाघांचा मृत्यू झाला. तर २०१६ मध्ये १६ आणि २०१७ मध्ये तब्बल २१ वाघांचा मृत्यू झाला. यात काही वाघांचा नैसर्गिक मृत्यूही झाला असावा. पण वाघांना ठार मारल्याच्या घटना पाहता सुधीर मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील असावेत, असे त्यांनी सांगितले. जय वाघ अजूनही बेपत्ता असून ही साधी गोष्ट नाही. गेल्या वर्षभरात १७ बिबट्यांचाही मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहता या क्षेत्रात शिकार करणारे माफिया सक्रीय झाल्याचे दिसते आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतात, असेही निरुपम यांनी सांगितले.

वाघांच्या संरक्षणासाठी वनमंत्र्यांनी अजूनही भक्कव व्यवस्था का निर्माण केलेली नाही. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी का केली जात नाही. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक शिकारी सक्रीय असल्याचे अहवाल समोर आले आहे. सुधीर मुनगंटीवार हे ज्या पद्धतीने काम करतायंत त्यावरुन त्यांचे आंतरराष्ट्रीय शिकारी माफियांशी साटेलोटे असल्याचे दिसते. ते वनमंत्री या पदावर काम करण्यास पात्र नाहीत. गुन्हा दाखल करुन मुनगंटीवार यांना अटक केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.