काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले असतानाच आता मुनगंटीवार यांनीही निरुपम यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हिनता आहे. निरुपम यांनी सत्याचा निर्घृण खून केला असून निरुपम यांच्याविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन काँग्रेसने शनिवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले. मुनगंटीवार हे प्राण्यांच्या हत्येसाठी ओळखले जातात. ते शिकार करणाऱ्या माफियांच्या टोळीत सामील असावेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला होता. मुनगंटीवार यांची वनमंत्रीपदावरुन हकालपट्टी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही निरुपम यांनी केली होती.

संजय निरुपम यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हिनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाही. सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. निरुपम यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार”, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. अवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात निरुपम यांनी केलेले सर्व आरोप मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले.