भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र औरंगाबाद येथेच व्हावे, या मागणीला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळे बगल मिळाली आहे. मंजूर असणाऱ्या कोणत्याही संस्था एका जिल्ह्यातून दुसरीकडे हलविल्या जाणार नाहीत, असे ते शुक्रवारी म्हणाले. ‘साई’चे केंद्र औरंगाबादलाच राहील का, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) प्रादेशिक केंद्र नागपूरला होईल, अशी अधिसूचना जारी झाल्यानंतर औरंगाबादचे केंद्र हलविले जाऊ नये, या प्रयत्नास सुरुवात झाली. या पाश्र्वभूमीवर अर्थमंत्री मुनगंटीवार यांना या विषयी औरंगाबाद येथील ऑटो क्लस्टरच्या कार्यक्रमानंतर विचारले असता ‘कोणतीही मंजूर झालेली संस्था अन्यत्र हलविण्याचा विचार नाही’ असे ते म्हणाले. हेच वाक्य ते वारंवार उच्चारत असल्याने स्पष्ट काय ते सांगावे, अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा कागदावर तसे काही आहे काय, असा उलट प्रश्न त्यांनी केला. साईचे प्रादेशिक केंद्र नागपूरला असेल, अशी अधिसूचना जारी झाली आहे. त्यामुळे ती संस्था औरंगाबादला होणार नाही, असेच मानले जात होते. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने नवा संभ्रम निर्माण झाला आहे.
भाजपमधील मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून राईचा पर्वत केला जात आहे. चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. जी खरेदीच झाली नाही, त्यात विनोद तावडे यांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, असे कोण करतो आहे, याचा शोध घेतला जात आहे. तो शोध पक्षांतर्गत आहे का, असे विचारताच ‘तो शोध संपला की सांगू’ असे ते हसत म्हणाले. जिल्हास्तरावर दर करारने खरेदीसाठी ५० लाख रुपये, तर राज्यस्तरावर २ कोटी रुपयांची मर्यादा घालणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.