करोनाचा प्रादूर्भााव रोखण्यासाठी दीर्घ काळ बंद ठेवण्यात आलेली राज्यभरातील मंदिरे गेल्या आठवडय़ापासून खुली झाली असली तरी या मंदिराबाहेर सागर किनारी चालणाऱ्या जलक्रीडा उपक्रमांना (वॉटर स्पोर्ट्स) मेरी टाईम बोर्डाने करोनाचे कारण देत टाळे ठोकले आहे.

करोनाचा संसर्ग वाढवल्यामुळे गेल्या एप्रिल महिन्यापासून देशाच्या अन्य भागांप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यतीलही सर्व व्यवहार ठप्प झाले होते. स्वाभाविकपणे सर्व प्रकारच्या उद्योग—व्यवसायांची आर्थिक उलाढाल बंद पडली होती. हा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ‘अनलॉक’ची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे. त्यामध्ये गर्दीचा सर्वांत जास्त धोका असलेली मंदिरे व अन्य धार्मिक स्थळेही गेल्या आठवडय़ात खुली झाली. या मंदिरांपैकी सर्वांत प्रसिद्ध गणपती पुळे देवस्थानाच्या परिसरातील समुद्र किनाऱ्यावर चालणाऱ्या विविध जलक्रीडा व्यवसायांनाही चांगला प्रतिसाद असतो. मंदिर खुले झाल्यामुळे हे व्यवसायही सुरू करण्यात आले. पण त्यातून करोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका असल्याचे कारण पुढे करून मेरी टाइम बोर्डाने अचानक बंदी घातली आहे. टाळेबंदीमुळे विस्कळित झालेली  आर्थिक घडी विस्कळीत पुन्हा बसवण्याची धडपड करत असलेल्या या उपक्रमांच्या चालकांमध्ये या तुघलकी कारवाईमुळे तीव्र नाराजी पसरली आहे.

कोकणातील किनाऱ्यांवर स्थानिकांनी विविध पर्यटनपूरक व्यवसाय सुरु केले आहेत. त्यामध्ये जलक्रीडांचा समावेश असून गणपतीपुळेसह जिल्ह्यतील अन्य काही सागर किनाऱ्यांवर मिळून १७ स्पीड बोटींसह ५ वॉटर स्कूटरच्या माध्यमातून हा व्यवसाय चालतो. कोशरोनामुळे किनारे ओस पडले आणि या व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली.  कोकणातील पर्यटनाचा ऐन हंगाम असलेल्या एप्रिल—मे महिन्यात करोनाला रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली. त्याचा फटका गणपतीपुळे किनारी सुरु असलेल्या सर्वच व्यावसायिकांना बसला.

गेल्या आठवडय़ात ऐन दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर  शासनाने मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडले. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरही उत्तम प्रतिसाद आहे. त्याचा फायदा घेऊन बिघडलेली आर्थिक घडी सुधारण्यासाठी गणपती पुळेच्या समुद्र किनाऱ्यावर जलक्रीडेचे उपक्रम सुरू झाले. पहिल्या चार दिवसात पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. पण हे करताना आवश्यक निर्बंध पाळले तक्रार झाली आणि त्याबाबत आग्रह धरण्याऐवजी मेरीटाइम बोर्डाने सरसकटपणे बंदीच घालून टाकली.

या संदर्भात अलिबागमध्ये तक्रार करण्यात आली होती. पाण्यात फिरण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या नौकांमधून पर्यटकांना फिरवले जात असल्याचे त्या तक्रारीमध्ये नमूद केले होते. त्यामुळे तेथील प्रशासनाने नौकाविहार बंद केला. त्यानंतर बुधवारी रत्नागिरीतही मेरी टाईम बोर्डाकडून बोटी समुद्र किनाऱ्यावरील जलक्रीडा उपक्रमांना टाळे ठोकण्यात आले.

पुढील आठवडय़ापासून पर्यटक पुन्हा कमी होण्याची शक्यता असल्यामुळे सध्याच्या प्रतिसादाचा व्यावसायिकांना लाभ झाला असता. पण प्रशासनाला किनाऱ्यावरील गर्दीवर नियंत्रण ठेवता आलेले नाही, म्हणून जलक्रीडा उपक्रमांवरच बंदी का, असा प्रश्न या व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा वॉटर स्पोर्टस् संघटेनेने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ही बंदी तातडीने उठवण्याची मागणी केली आहे.