करोनाच्या संक्रमणकाळात तांत्रिक मदतीने विद्यादानाचे यशस्वी कार्य केल्याबद्दल ‘क्यू एस’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे वर्धा येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठास पुरस्कार देण्यात आला आहे.

क्यू एस म्हणजेच ‘क्वॅकरॅली सिमंड्स’ या संस्थेद्वारे जागतिक पातळीवर शासकीय, खासगी तसेच अभिमत विद्यापीठातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता तपासली जाते. त्यानुसार क्यू एस श्रेणी प्रदान होत असते. पुरस्कार हे संस्थेतील संशोधन कार्य व सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी व शिक्षक संवाद, नोकरीच्या संधी, सामाजिक योगदान, जनजागृती, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग व अन्य निकष पाहून दिल्या जातात. संस्थेतर्फे भारतातीलही उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचे अवलोकन व परिक्षण या संस्थेने केले होते.

कोविड‑१९ च्या काळात मेघे अभिमत विद्यापीठाने व्यावसायिक अभ्यासक्रमात अवलंबलेली ई‑लर्निंग शिक्षण प्रणाली अत्यंत प्रभावी ठरली. विद्यार्थी व शिक्षक यातील प्रतिबध्दता, शिक्षण व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर आणि नियमीत सराव या निकषावर या विद्यापिठाला पूर्ण गुण प्रदान करण्यात आले. या खेरीज विविध क्षेत्रात प्राप्त केलेल्या यशस्वी योगदानाचीही दखल क्यू एसद्वारे घेण्यात आली होती.

या पुरस्काराने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी व्यक्त केली. विद्यापिठाला प्राप्त झालेल्या या सन्मानात कुलपती दत्ता मेघे, प्र‑कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, विश्वास्त सागर मेघे, प्र‑कुलगुरू डॉ. ललीत वाघमारे व अन्य सहाकाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे डॉ. बोरले म्हणाले.