जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांत ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांचा एल्गार

लोकसत्ता, प्रशांत देशमुख 

वर्धा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात दारू व अन्य प्रलोभनांचा मारा थांबविण्यासाठी विविध जिल्हय़ांतील महिला मंडळे आक्रमक झाल्याने गावपुढारी पेचात पडलेले दिसत आहेत. येत्या शुक्रवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानापूर्वीच्या काही दिवस मतदारांना विविध प्रकारे प्रलोभने दाखविली जात आहेत. त्यात प्रामुख्याने दारूचे आमिष दिले जाते. याचा मतदानावर होणारा परिणाम लक्षात घेऊन सर्वोदयी नेते भाई रजनीकांत यांच्या नेतृत्वात भारतीय जनसंसद या व्यासपीठाच्या माध्यमातून राज्यातील काही जिल्हय़ांत महिला मंडळ सक्रिय झाले आहे.

राज्यातील १४ हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. मटण, दारूचे आमिष दाखवून निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात सर्वोदयी नेते भाई रजनीकांत म्हणाले, युवकांना व्यसनी केले जात आहे. म्हणून निवडणूक क्षेत्रात दारू विक्रीवर नियंत्रण असावे, गावात पोलिसांचा पहारा असावा, धाब्यांवर नियमबाहय़ दारू विक्री होणार नाही, रात्री मुदतीबाहेर दुकाने चालू राहणार नाहीत, अशी विनंती शासनाला केली आहे. ‘जे पाजतील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवारांना ‘नोटा’ मारू’, पक्ष पाजतील दारू तर त्यांना मतदान ना करू, घेऊन आलात दारू तर त्याला नक्कीच पाडू, अशा घोषणा महिला मंडळतर्फे  गावोगावी दिले जात आहेत.

याबाबत म्हसाळा येथील रेखा किटे म्हणतात, १५ दिवसांत आठशे रुपयांची दारू पाजून पाच वर्षे स्वत:चे घर भरणारा सरपंच गावाचे वाटोळेच करणार. ग्रामसेवक कशावर सहय़ा घेतो, हेदेखील भान न ठेवणारा सरपंच काय कामाचा? खर्च करू द्या, पण अशा उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन आम्ही करतोय. प्रसारपत्रके काढून  काही गावांत यात्रा निघत आहेत. दारूमुक्ती आंदोलनातील यवतमाळचे रवी गावंडे, राज्य संघटिका रत्ना खंडारे (अकोला), बुलढाणा येथील अ‍ॅड. रत्नमाला गवई, माया धांडे, साताऱ्याच्या शालिनी वाघमारे, अहमदनगरचे देवराव अंबोरे व अ‍ॅड. रंजना गवांदे, येळाकेळीच्या पुष्पा झाडे आंदोलनाच्या अग्रभागी आहेत. गावपातळीवर दारूबंदीबाबत कारवाई करण्याचे अधिकार पोलीस पाटील यांना असतात. ते दारू जप्त करू शकतात, झडती घेऊ शकतात. मात्र अनेक पोलीस पाटलांना त्यांचे अधिकारच माहीत नसल्याने त्यांना प्रशिक्षण देण्याची विनंती आंदोलकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे येळाकेळीला आले असता त्यांना पुष्पाताईंनी दारूबंदीचे काय, असा थेट सवाल केला. आम्ही दारू विक्री हाणून पाडतो, मात्र आमच्यावरच कारवाई होते. गावठी दारूचा प्रश्न तर आहेच. पण जिल्हय़ात तयार न होणारी विदेशी दारू पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय विकली जावूच शकत नाही, असा थेट आरोप मंत्र्यांकडे केला. जळगाव जामोद परिसरातील १५ गावात माया धांडे यांनी निवडणूक काळात दारू विक्री न करण्याची तंबीच दिली.

बीडच्या सत्यभामा सुंदरलाल यांनी पोलिसांचे संरक्षण न घेता दारू गुत्ते बंद पाडल्याचा दाखला दिला. अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या महिलांना हत्येच्या धमक्याही येत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जातो. अशा वेळी पोलिसांचे संरक्षण आवश्यक असल्याचे मत सेवाग्रामच्या गीता कुंभारे यांनी व्यक्त केले.

नेहमीप्रमाणेच निवडणुकीच्या काळातही महिलांवरच दबाव असतो. तिचे मत गृहीत धरले जाते. सुरक्षा मिळत नाही. कुटुंबातील महिलांच्या मतासह काही पुरुष मतांचा गठ्ठा असल्याचे सांगत सौदेबाजी करतात. या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे  सायंकाळच्या वेळी प्रबोधन सभा घेतल्या जात आहेत. योग्य उमेदवार निवडण्यासाठी आवाहन केले जात आहे.