करोना विषाणूविरूध्दच्या लढाईत जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत स्वच्छाग्रहींकडून ग्रामीण भागात हात स्वच्छ कसे धुवावेत, याचे प्रात्यक्षिक दाखवित जाणीव जागृती करण्यात येत आहे. ग्रामस्थांना वैयक्तिक आणि परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच, ग्रामसेवक तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावागावात औषध फवारणी करून गाव र्निजतूक करण्यात येत आहे. तसेच ग्राम स्तरावर कार्यरत असलेल्या आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी,

ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छाग्रही यांच्यामार्फत करोना या संसर्ग आजारापासून बचाव होण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये मास्क लावणे, हात धुणे, तोंडाला नाकाला रुमाल बांधणे, सामाजिक अंतर राखणे याविषयी जाणीवजागृती करण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेविषयक बाबींवर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आणि जाणीव जागृतीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंसेवक म्हणून एक किंवा दोन असे एकूण ११४८ स्वच्छाग्रही नियुक्त करण्यात आले आहेत. या स्वच्छाग्रहीची ग्रामस्तरावरील स्वच्छतेविषयक कामांसाठी शासनाला नेहमीच मदत होते. करोनाविरुद्धच्या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छाग्रहींना सहभागी करून घेण्याविषयी राज्यस्तरावरून सुचना प्राप्त होत्या. त्यानुसार पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षां फडोळ यांनी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राच्या कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छाग्रहींना या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेऊन गावात काम करण्याविषयी प्रोत्साहित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्वच्छाग्रहींनी करोना विषाणूबाबत गृहभेटीच्या माध्यमातून सामाजिक अंतर राखणे, खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्क वापरणे, हात धुणे याविषयी वैयक्तिकरीत्या किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या सोबत घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती केली जात आहे.

तसेच बहुतांश ठिकाणी स्वच्छाग्रहींमार्फत ग्रामस्थांना हात धुण्याची पद्धत, हात कसे धुवावेत,याबाबत प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत वाटप करण्यात येत असलेले मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्याच्या कामातही स्वच्छाग्रही पुढाकार घेत आहेत. ग्रामस्थांना शौचालय वापर, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता याविषयी माहिती देऊन जाणीव जागृती केली जात आहे.