राज्यात एकीकडे लॉकडाउनच्या चर्चेनं फेर धरल्यानंतर विरोधी पक्ष भाजपा आक्रमक होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. या मुद्द्यावरून आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाक् युद्ध सुरू झालं आहे. फडणवीसांनी दिलेल्या उत्तरानंतर आव्हाड यांनी पलटवार करत थेट सवाल केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा इशारा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती. इतर देशातील लॉकडाउनची उदाहरण देत त्यांनी आर्थिक पॅकेजही दिल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावर ‘जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या काळात नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी २० लाख कोटींचं पॅकेज दिलं,’ असं फडणवीस म्हणाले होते.

फडणवीसांनी केलेल्या टीकेवरून आव्हाडांनी थेट उलट सवाल केला आहे. “२० लाख कोटी हे मी शब्दात लिहू शकतो. पण आकड्यात किती शून्य येतात हे माझी स्मरणशक्ती कामकुवत असल्याकारणाने काही जमत नाही. आपली स्मरणशक्ती मजबूत असल्याकारणाने या शून्यांमधील किती शून्य महाराष्ट्राच्या वाट्याला आले. हे जर सांगितल तर ते मी नक्कीच पाठांतर करून माझ्या स्मरणात ठेवीन,” असा टोला आव्हाडांनी फडणवीसांना लगावला आहे.

“फक्त एवढंच तुम्हांला आठवणीनं सांगतो की, केंद्र सरकारनं सुरुवातीच्या काळामध्ये दिलेली वैद्यकीय सामुग्री पीपीई किट, व्हेंटिलेटर इ. वैद्यकीय सामान देखील काही दिवसानंतर देण्याच बंद केल होतं. एवढं माझ्या स्मरणात आहे,” अशा शब्दात आव्हाड यांनी फडणवीसांना उत्तर दिलं आहे. “आरे हो, महाराष्ट्राचे हक्काचे जीएसटीचे २४००० कोटी केंद्राकडे बाकी आहेत ते आपल्या एका शब्दावर मिळतील. देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राच्या हिता साठी तेवढे करा …टीका पण करा,” असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.