कुंभमेळ्यात अयोध्येतील राम मंदिर प्रश्नावर ठोस निर्णय होईल या दृष्टीने संत संमेलनात मंथन होणार असून जे पंथ आजवर कुंभापासून दूर राहिले, त्यांनाही शाही स्नानात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. समान नागरी कायदा, गोवंश हत्याबंदी कायदा या मुद्दय़ांवर संमेलनात चर्चा होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राम जन्मभूमी वादाविषयी महंत ग्यानदास महाराज यांनी केलेल्या विधानाला विहिंप महत्त्व देत नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याबाबत ते सुरुवातीपासून नव्हते. त्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे आबदेव यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर केवळ उच्च न्यायालय अथवा संसदेत विशेष कायदा पारित करून हा प्रश्न निकालात काढता येऊ शकतो. गोवंश हत्या बंदी कायद्याला ५२५ खासदारांचा विहिंपला पाठिंबा असून त्याबाबत सार्वमत होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला. पर्वणी काळात वनवासी पंथ म्हणजे आदिवासी संत आणि समाजालाही शाही स्नानात सहभागी होता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभपर्वात विश्व हिंदू परिषद संत संमेलनासह आरोग्य सेवा, भुले-भटके साहाय्यता केंद्र, बहुभाषिक भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवासी मार्गदर्शन केंद्र आदी उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ६ सप्टेंबर रोजी येथील संत जनार्दन स्वामी मठ परिसरात होणाऱ्या संत संमेलनात राम जन्मभूमी प्रश्न, हिंदींची घटती लोकसंख्या पाहता समान नागरी कायदा, संपूर्ण देशात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करावा आदी विषयांवर चर्चा होणार आहे. याबाबत सार्वमत घेऊन पंतप्रधानांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच परिषदेच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत चर्चा होईल. संमेलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी त्र्यंबक येथे कुंभमेळ्यातील विविध आखाडय़ांचे पदाधिकारी, महंत, मंडलेश्वर यांच्याशी चर्चा होणार आहे. त्यात परिषदेचे आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पदाधिकारी सहभागी होतील. तसेच कुंभपर्वात विहिंप नाशिक साधुग्राम परिसरात दोन ठिकाणी, तर त्र्यंबक येथे एका ठिकाणी अन्नछत्र चालवणार आहे. मेळ्यातील भाविकांना आरोग्य सेवा देण्यासाठी चार फिरते दवाखाने कार्यान्वित करण्यात आले आहे. बहुभाषिक भाविकांची वाढलेली संख्या पाहता त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी १५ ठिकाणी मार्गदर्शन केंद्रे उभारण्यात येणार आहेत.