News Flash

#DhanyawadBalasaheb हॅशटॅग होतोय ट्रेण्ड; अमेरिकेतील सेलिब्रेशनच्या पोस्टरवरही झळकले बाळासाहेब

राम मंदिर भूमिपूजनानिमित्त नेटकऱ्यांना बाळासाहेबांची आठवण

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आज काढली जात आहे. एकीकडे शिवसेना तसंच इतर नेते बाळासाहेबांच्या आठवणी शेअर करत असताना ट्विटरवर देखील बाळासाहेब ठाकरेंचं नाव चर्चेत आहे. ट्विटरला भूमिपूजनानिमित्त अनेक ट्रेंड होत असून यामध्ये #DhanyawadBalasaheb टॉप ट्रेंडमध्ये आहे. अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे त्यामध्ये बाळासाहेबांचीही मोलाची भूमिका असल्याचं सांगत नेटकरी त्यांचे आभार मानत आहेत.

नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ट्विटवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे. अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात एक ट्विट केलं आहे.

संजय राऊत यांनी कोणताही कॅप्शन न देता सकाळी दहा वाजता एक फोटो ट्विटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये राम मंदिर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील मजकूर आहे. फोटोमध्ये भगवा झेंडा असणारा राम मंदिराचा घुमट दिसत आहे. भगव्या रंगाच्या या पोस्टकार्डमध्ये श्री असं अक्षर लिहिण्यात आलं आहे. मात्र श्रीवरील वेलांटीऐवजी तिथे शिवसेनेचे चिन्ह असणारं धनुष्यबाण दाखवण्यात आला आहे. श्री या अक्षराच्या बाजूला, “बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती” असं लिहिण्यात आलं आहे. फोटोच्या तळाशी, “गर्व से कहो हम हिंदू है” असं वाक्य आहे.

बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे येऊन या घटनेची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या भूमिकेवरुन देशभरात वादळ उठलं होतं. मात्र या घटनेनंतर शिवसेना या पक्षाची हिंदुत्ववादी संघटना ही ओळख समोर आली. ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ हा बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला नारा याच काळातला होता. त्यामुळे अयोध्या प्रकरण आणि बाळासाहेब ठाकरे यांचं एक अनोखं नातं होतं. त्यामुळेच प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारण्यासाठी जे भूमिपूजन केलं जातं आहे त्या ठिकाणी शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाची माती घेऊन उपस्थित झाले आहेत.

बाबरीसंदर्भात काय म्हणाले होते बाळासाहेब
बाबरी मशीद पाडल्यानंतर बाळासाहेबांनी अगदी रोखठोक भूमिका घेतली होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली. सकाळी दहाच्या सुमारास लाखांच्या संख्येत येथे कारसेवक जमले होते. त्यानंतर देशात प्रचंड सांप्रदायिक दंगेही उसळलेले बघायला मिळाले होते. अयोध्येत झालेल्या या घटनेनंतर बाळासाहेबांनी नेहमीच्या शैलीत यावर भूमिका मांडली होती. “साडेतीन हजार हिंदूंची देऊळ पाडण्यात येऊन त्यांच्या मशिदी बांधण्यात उभ्या राहिल्या. साडेतीन हजार. आम्ही काय म्हणतो आम्हाला साडेतीन हजार मशिदी पाडायच्या नाहीत. आम्हाला आमच्या फक्त तीन मशिदी द्या. बाबरी जी पडली. दोन पाडायच्या आहेत आणि ती काशी आणि मथुरा. बाकी ठेवा तुमच्याकडे. घाला लोटांगण,” असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.“बाबरी पाडली ही गौरवाचीच गोष्ट आहे. त्यात लाजण्यासारखं काही नाही. बाबरी मशीद पाडली गेली, कारण त्या खाली राम मंदिर होतं. इतिहास असं म्हणतो की, बाबरानं हिंदू देवळं पाडली. आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत, मशिदीच्या जागी देवळं उभी करू, यात मुस्लिमांनी सहभागी व्हायला,” असंही बाळासाहेब इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:52 pm

Web Title: ayodhya ram mandir bhoomi pujan dhanyawad balasaheb hashtag on trend on twitter sgy 87
टॅग : Ram Mandir,Ram Temple
Next Stories
1 रायगड : जिल्ह्यात पावसाचा जोर अद्यापही कायम; महाडमध्ये पूरस्थिती
2 राम मंदिर भूमिपूजन : संजय राऊतांना झाली बाळासाहेबांची आठवण, पोस्ट केला खास फोटो
3 पालघरमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस; NDRFची टीम रवाना
Just Now!
X