बाबराने िहदुस्थानवर आक्रमण करून बांधलेला ढांचा पाडण्यास साडेचारशे वर्षे लागली. त्याप्रमाणे राममंदिर बांधण्यासाठीही काही कालावधी लागणारच आहे. परंतु वेळ लागला तरी चालेल. अयोध्येत राममंदिर बांधणारच, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केली. शिर्डीच्या साईबाबांविषयी शंकराचार्यानी केलेले वक्तव्य धार्मिक नसून राजकीय आहे. शंकराचार्य हे काँग्रेसधार्जिणे धर्मगुरू आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी भंडारी उस्मानाबादेत आले होते. पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. ढांचा हा शब्द आपण हेतूत: उच्चारत आहोत. अयोध्येत पाडलेली मशीद नव्हती, तो केवळ ढांचा होता. मशीद असती, तर त्याचा मौलवी, मुतवल्ली असायला हवा होता. न्यायालयात तसा पुरावा आजवर एकदाही दाखल झाला नाही. अयोध्येत राममंदिर उभारले जावे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपची भूमिका आहे. मात्र, सर्वसमावेशक सहमतीनेच मंदिर उभारले जाईल, असेही भंडारी यांनी सांगितले.
येत्या दहा वर्षांत संघ शंभर वर्षांचा होईल. भाजपला मिळालेल्या यशामागे संघाचा ९० वर्षांपासून सुरू असलेला अविरत संघर्ष आहे. संघाने आपल्या भूमिका, ध्येयधोरणे आणि विचार कधीच बदलले नाहीत. त्यामुळेच जगातील सर्वात मोठे संघटन म्हणून आजमितीला संघाचा लौकिक आहे. संघाची धोरणे यापुढील काळात प्रभावीपणे अमलात आणली जातील. काश्मीरमधील ३७० कलमाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले संकेत त्याचेच द्योतक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काश्मीरच्या निर्वासितांना पुन्हा त्यांच्या जागी प्रस्थापित केले जावे, अशा पद्धतीची मांडणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणात केली. मागील अनेक वर्षांपासून संघाची हीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपात अनेक स्वयंसेवक विविध पदांवर कार्यरत आहेत. अडचणीच्या वेळी ते संघातील वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतात. त्यानुसार बहुतेक वेळा निर्णयही घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शंकराचार्य काँग्रेसधार्जिणे धर्मगुरू आहेत. ते धर्मगुरू झाल्यापासून काँग्रेसला पूरक वर्तन व वक्तव्ये करीत आहेत. शिर्डीच्या साईबाबांविषयी त्यांचे वक्तव्य धार्मिक नसून राजकीय आहे. समाजात धर्म-जातीद्वेष निर्माण व्हावा, या साठी साईबाबांविषयी असे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतंत्र लढण्याची रणनीती आहे काय, असा सवाल केला असता निर्णय घेण्याची रणनीती सध्या सुरू आहे. १५ ऑगस्टपूर्वी भाजप अधिकृत भूमिका जाहीर करेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक श्याम दहीटणकर, शहर संघचालक कृष्णा मसलेकर उपस्थित होते.