राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळावर सावरगाव येथे दरवर्षी विजयादशमीच्या दिनी मोठ्याप्रमाणावर साजरा होणारा भक्ती-शक्तीचा संगम असलेला दसरा मेळावा, यंदा करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन साजरा करण्याचे आवाहन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले आहे. ”बाबा मी येतेय…” , ”आपली परंपरा, आपला दसरा, आपले सीमोल्लंघन !!” असं त्यांनी ट्विट केलं आहे.

भक्तांनी आपपल्या गावात राहूनच भगवानबाबांची मिरवणूक काढावी व मीडियाच्या माध्यमातून माझे मार्गदर्शन ऐकावेत असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरवर्षी आपण संख्येचा विक्रम करत असतो यंदा, कार्यक्रमांचा विक्रम करूयात असेही त्यांनी फेसबुक पेजवरून व्हिडिओद्वारे आवाहन केले आहे.

मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यंदा पंकजा मुंडे काय भाष्यं करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे आपल्या समर्थकांसह भगावानबाबाच्या भक्तांना आवाहन करताना म्हणाल्या, ”सर्व भगवान भक्तांना माझा नमस्कार.. मी आपल्या सर्वांना आवाहन केलं होतं की, दसऱ्याचा मेळावा आपली परंपरा ही आपण वेगळ्या पद्धतीने कायम करायची आहे. या आव्हानास प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. दसरा मेळावा ही आपली परंपरा भक्ती आणि शक्तीचा हा संगम आहे. या निमित्त प्रथेमप्रमाणे दसऱ्याच्यादिवशी मी भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भगवान भक्तीगड सावरगाव येथे जाणार आहे.” या ठिकाणाहून साडेबारा वाजता मी तुम्हा सर्वांशी संवाद साधणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

”मी आपल्या सर्वांना आव्हान केलं की यावर्षी आपण एक वेगळा विक्रम करूयात, या दसऱ्याचं एक वेगळं सीमोल्लंघन करूयात. आपण दसऱ्याला दरवर्षी मोठ्या संख्येचा विक्रम करतो. या वर्षी आपण जास्त संख्येने कार्यक्रम करण्याचा विक्रम करायचा आहे. मी आवाहन केलं आहे की प्रत्येक गावांमध्ये आपण सर्वांनी भगवानबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढायची आहे व प्रतिमेचे पुजन करायचे आहे. त्या ठिकाणी एकमेकांनी विचारांच आदान-प्रदान करायचं आहे. या कार्यक्रमानंतर सर्वांनी मीडिया व सोशल मीडियाद्वारे भगवान भक्तीगडाचं दर्शन करायचं आहे.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, करोनाचे सर्व नियम पाळून आपल्याला हा दसरा मेळावा यशस्वी करायचा आहे. परळी येथील गोपीनाथ गडाचं दर्शन घेऊन मी सावरगावला जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.