रामदेवबाबांची ग्वाही

पतंजली योगपीठाने वस्त्रोद्योगात पदार्पण करून येत्या पाच वर्षांत १५ ते २० हजार कोटींच्या व्यवसायाचा संकल्प केला आहे. यात  दीड हजार कोटीचा व्यवसाय सोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या  माध्यमातून मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी सोलापुरी चादर, टॉवेल, बेडशिटसह तयार कपडय़ांच्या उत्पादनांना वाव देता येईल, अशी ग्वाही पतंजली योगपीठाचे योगगुरू रामदेवबाबांनी दिली.

सोलापुरात रविवारी दुपारी शिवछत्रपती रंगभवनात वस्त्रोद्योगाशी संबंधित उद्योजक व व्यापाऱ्यांशी योगगुरू रामदेवबाबांनी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. चादर व टॉवेल कारखानदारांसह सूत उत्पादक, गारमेंट कारखानदारांच्या प्रतिनिधींनी प्रारंभी आपापल्या अडचणी मांडल्या. एकेकाळी सोलापूरचा वस्त्रोद्योग भरभराटीला गेला होता. काळानुरूप वाढती स्पर्धा आणि अन्य कारणांमुळे हे गतवैभव लयास गेले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी येथील वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी आदींनी अडचणी मांडल्या.

सहकार व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी, वस्त्रोद्योगाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी सोलापूरचे मार्केटिंग झाले पाहिजे. सोलापूरची नाममुद्रा निर्माण व्हावी, त्यासाठी आगामी काळात सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ‘मेक इन सोलापूर’ची संकल्पना राबवू, अशी अपेक्षा व्यक्त  केली. योगगुरू रामदेवबाबांनी संवाद साधताना सोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या व्यवसायाची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर करीत  सर्वाना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ‘पतंजली’ने बाजारपेठेत विविध उत्पादने आणताना विश्वास, जिद्द, कष्ट, गुणवत्ता आणि बुध्दिचातुर्याचा उपयोग केला. त्यामुळे पतंजलीने नाममुद्रा निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.

या नाममुद्रेमुळे ‘पतंजली’ला उद्या कोणीही उपद्रव देऊ शकत नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले चांगले मित्र आहेत. भविष्यात कदाचित देशाच्या राजकारणात परिवर्तन होऊ शकते आणि सत्तेवर दुसराच कोणी येऊ शकतो. परंतु सत्ता कोणाचीही असू द्या, पतंजलीला अजिबात उपद्रव होणार नाही. कारण आपण त्यात गुणवत्ता टिकवून ठेवली आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्वदेशीचा अर्थ समग्र, स्थायी, विकेंद्रित आणि न्यायपूर्ण विकास असा आहे. असाच विकास अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.