यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे कथा लेखनासाठी देण्यात येणारा बाबुराव बागूल कथा पुरस्कार २०१३चे वितरण ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध कवी व ८७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते नांदेड येथे करण्यात येणार आहे.
नांदेड येथील कुसुम सभागृहात होणाऱ्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री डी. पी. सावंत, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर उपस्थित राहणार आहेत.
मुक्त विद्यापीठातर्फे साहित्य, समाजसेवा, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. ज्येष्ठ कथालेखक, कादंबरीकार बाबुराव बागूल यांच्या स्मरणार्थ कथा लेखनाच्या प्रांतात असे कार्य केलेल्या कथा लेखकास दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
२०१३ वर्षांच्या या पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यातील केकत सिंदगी येथील क्रांती माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक अंकुश सिंदगीकर यांच्या ‘गंधरव’ कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. २१ हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, नांदेड विभागीय केंद्राचे संचालक डॉ. पी. एम. शिंदे यांनी
केले आहे.