आजी – आजोबा आपल्या मुलांचे बेबीसिटर आहेत या कल्पनेतून पालकांनी बाहेर येण्याची गरज आहे. मुलांचा सांभाळ करणे ही त्यांची जबाबदारी नाही असं पुणे कुटुंब न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. उतरत्या वयात नातवंड त्यांच्यावर ओझं होऊ नयेत असंही न्यायलयाने सांगितलं आहे. एका महिलेने कुटुंब न्यायालयात धाव घेत आपल्या आणि मुलांच्या देखभालीकरिता याचिका दाखल केली होती. महिलेने आपले सासु-सासरे मुलांचा सांभाळ करत नसल्याने त्यांना पाळणाघरात ठेवत लागत असल्याचा दावा केला होता. न्यायालयाने निकाल देताना महिलेला फटकारलं आहे.

“आपल्या लहान मुलांची काळजी घेणं ही आजी-आजोबांची नाही तर त्यांच्या पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे. आजी-आजोबा तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तसंच मार्गदर्शन करण्यासाठी असतात. त्यामुळे उगाच त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत, त्यांना नातवंडांचा सांभाळ करणं प्राथमिक कर्तव्य असल्याचं सांगत दबाव आणला जाऊ शकत नाही”, असं न्यायालयाने सांगितलं आहे. महिलेने अशाप्रकारे आपल्या सासू-सासऱ्यांना जबाबदार धरणं अत्यंत चुकीचं असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.

“जर मुलांना पाळणाघरात ठेवावं लागत असेल तर त्यासाठी आजी-आजोबांना जबाबदार धरु शकत नाही”, हे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केलं आहे.

आजकाल महिलादेखील सुशिक्षित होत असून आपल्या पतीप्रमाणे नोकरीला जात असल्याचं लक्षात घेत न्यायाधीश स्वाती चौहान यांनी सांगितलं की, “लहान मुलांना पाळणाघऱात ठेवावं लागणं यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. आपली तब्बेत, इच्छा, प्लॅन यांचा विचार करता आजी-आजोबांनी बेबीसिटिंगची जबाबदारी घ्यायची की नाही याचा पूर्ण हक्क त्यांना आहे”, असं निकालात सांगण्यात आलं आहे.