भाजपा सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपत आहे

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सरकारला जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करावेत,अशी विरोधी बाकावर असताना मागणी करणारी भाजपा आज सत्तेवर आल्यापासून सातत्याने शेतकरी हिताविरोधी निर्णय घेत असून, शेतकऱ्यांचा आवाज दडपत असल्याच्या निषेधार्थ येत्या ११ ते २१ एप्रिल या कालावधीत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते पंतप्रधान निवासस्थानापर्यंत शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, विश्वास जाधव, चंद्रकांत यादव, दीपक पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश माळी आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.

आमदार बच्चू कडू म्हणाले, की उत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफीचे आश्वासन देताना महाराष्ट्रात कर्जमाफी देता येणार नाही अशी भाजप सरकारची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबात अन्यायी भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आमदारांना निलंबित करणे हे लोकशाही व्यवस्थेत बसत नाही. ही सरकारची दडपशाही आहे. शेतकरी हिताविरोधी भूमिका घेणाऱ्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा आसूड मोर्चा ११ एप्रिलला महात्मा फुले यांच्या जन्मदिनी मुख्यमंत्र्यांचे नागपूरचे निवासस्थान ते गुजरात येथील नरेंद्र मोदी यांचे निवासस्थानापर्यंत काढण्यात येणार आहे.

भाजपाने सत्तेवर येताच शेतकऱ्यांबद्दलची आपली भूमिका बदलली, नोटबंदी, नापिकी यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत असताना शेतकऱ्याला कर्जमाफी देता येणार नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका लाजिरवाणी आहे.  आमदारांच्या मानधनात वाढ करताना, चर्चा करणे त्यांना गरजेचे वाटत नाही. पण, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे म्हटले की, लगेच सर्वाशी चर्चा करू अशी बोटचेपी भूमिका मुख्यमंत्री घेत आहेत. भाजपा सरकार फार विचित्र वागत असून, त्यांना शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांचे हित महत्त्वाचे वाटते. बळीराजाच्या अडचणीचे यांना काहीही घेणे-देणे नसल्याची टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा आणि शेतमालाला हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र, आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे, असा संतप्त सवाल करून शेतकऱ्याच्या सर्वाधिक आत्महत्या या सरकारच्या कार्यकालात झाल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. रंगराजन समितीच्या शिफारशी मान्य करा ही अनेक वर्षांची मागणी सरकार मान्य करत नाही. पण, उद्योगधार्जीणे निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांचा कांदा महाग झाला की लगेच बोंबाबोंब केली जाते पण शेतकऱ्यांच्या मालाला मिळणाऱ्या कमी भावाबद्दल मात्र, कसा आवाज उठला जात नाही. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोंडघशी पडले असल्याचे आमदार कडू म्हणाले.