“राज्यातील दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे”, असं विधान महाविकास आघाडी सरकारचे जलसंपदा आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे. आत्तापर्यंत आम्हाला (शेतकऱ्यांना) किती लुटलं गेलं याचा हिशोब सरकारने दिला तर त्यांच्याकडेच आमचे पैसे निघतील, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले. पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

तूर डाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही अशी खंत बच्चू कडूंनी यावेळी व्यक्त केली. तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. हे नुकसान अगणित असून त्याचा अंकात विचारही करता येणार नाही”, असा आरोप बच्चू कडूंनी केला आहे.

देशात कायद्यावर कायदे येत आहेत पण शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा मात्र हे केंद्र सरकार आणू शकत नाही अशी टीका ही त्यांनी यावेळी केली. “राष्ट्रवादी आणि काँग्रेसने थकविल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुट्टीवर जावं लागलं असं वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे हे विचार करण्याजोगते नाहीत”, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.