News Flash

शिर्डीतला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित; ग्रामसभेत करण्यात आली घोषणा

आज (रविवार) मध्यरात्रीपासून हा बंद मागे घेण्यात येणार आहे.

(छाया सौजन्य - एएनआय )

साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. शिर्डीच्या ग्रामस्थांकडून ग्रामसभेत याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार, आज (रविवार) मध्यरात्रीपासून हा बंद मागे घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी गावच्या शिष्टमंडळाला निमंत्रण देऊन याबाबत सोमवारी बैठक बोलावली आहे. त्यामुळे साईभक्तांचा विचार करता सध्याचा बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आज मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा बंद मागे घेण्यात येणार आहे. उद्याच्या बैठकीत जर मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवली येईल, असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.

साई बाबांच्या जन्मस्थळाचा वाद आणि शिर्डीकरांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. मुगलीकर यांनी ही माहिती दिली आहे.

मुगलीकर म्हणाले, “शिर्डीत कडकडीत बंद पुकारण्यात आला असला तरी मंदीर मात्र भाविकांसाठी खुले आहे. साई मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी राहण्याखाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.” दरम्यान, या बैठकीनंतर शिर्डीतील बंदवर तोडग्याबाबत हा वाद निवळण्याबाबत निर्णय होण्याची आशा आहे.

दरम्यान, साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्याची चर्चा सुरू झाल्याने वादाला तोंड फुटले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे.

पाथरीच्या विकासाला शंभर कोटी देण्यास आमचा विरोध नाही. पण बाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याच्या तर्काला आमचा विरोध आहे. बाबांनी जन्मस्थळ उघड केले नाही. पण ठाकरे यांच्यामुळे जन्मस्थानावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ते भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे आहे. त्यामुळे पाथरीची जन्मस्थान म्हणून ओळख नको, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले आहे. बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, साई मंदिर सुरू राहणार आहे. पण, वाहनांसोबत शिर्डीतील हॉटेल्स आणि दुकानं देखील बंद असल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 7:55 pm

Web Title: back off shirdi the announcement was made in the gram sabha aau 85
Next Stories
1 १९६२ साली इजिप्तमध्ये पाहिलेलं इंजिन कोल्हापुरात बनवलेलं होतं -शरद पवार
2 साई जन्मस्थळाचा वाद; मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
3 वडिलांचं छत्र हरवलेल्या चिमुकल्याचा डोळ्यात पाणी आणणारा निबंध; पप्पा तुम्ही लवकर परत या…
Just Now!
X