06 August 2020

News Flash

महाडमधील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची दुरवस्था

महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या स्मारकाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे,

| February 5, 2013 04:11 am

महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या स्मारकाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे स्मारकाची अनेक दालने वापराविना धूळ खात पडली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडमधील चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून सामाजिक समतेचा संदेश दिला. त्यानंतर २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले. या दोन घटना समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आणि त्यामुळे समाज पेटून उठला. या ऐतिहासिक घटनांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी राज्य शासनाने महाड शहरातील चवदार तळे सौंदर्यीकरण आणि राष्ट्रीय स्मारकाची उभारणी केली. समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या या स्मारकाची वास्तू सध्या भयाण अवस्थेत दिवस काढीत आहे. स्मारकाची असंख्य दालने, जलतरण तलाव यांचा बांधल्यापासून वापरच झालेला नाही, त्यामुळे  स्मारकाच्या इमारतीला अवकळा आली आहे.
युती शासनाच्या काळात त्या वेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते दि. १४ एप्रिल १९९८ रोजी स्मारकाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. सुमारे दहा हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. स्मारकामध्ये भव्य असे वातानुकूलित प्रेक्षागृह, संग्रहालय व वाचनालय, तरणतलाव व ड्रेसिंग रूम, बहुउद्देशीय सभागृह व उपाहारगृह इत्यादी विविध दालने, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती ब्रॉंझचा पुतळा व अंतर्गत रस्ते डांबरीकरण, प्रेक्षागृहांतील फर्निचर, पाणीपुरवठा व जलनि:सारण, विद्युतीकरण, पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन यांचे काम करण्यात आले. सुरुवातीला सतरा कोटींचे असणारे काम नंतर २२ कोटींवर गेले. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत दि. १० ऑगस्ट २००४ रोजी स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
सन २००४ पासून आजपर्यंत इमारतीमधील प्रेक्षागृह, वाचनालय, सभागृह यांचा वापर सोडला, तर अन्य दालने अजूनही रिक्त आहेत. सुमारे ७५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला तरणतलाव वापराविना पडून आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे येथील ज्या संस्थेच्या ताब्यात समाज कल्याण विभागाने स्मारक दिले आहे त्यांच्याकडून त्याची योग्य प्रकारे देखभाल केली जात नसल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.  महाडमधील मधुकर गायकवाड, मिलिंद खांबे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाज कल्याण विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे खांबे यांनी सांगितले. जानेवारी २०१३ पर्यंत स्मारकाचे विजेचे बिल थकल्याने अखेर वीज वितरण कंपनीला पुरवठा खंडित करावा लागला. अखेर सर्व थरांतून गदारोळ उठल्याने वीज बिलाची थकीत रक्कम तातडीने भरण्यात आली. स्मारकामध्ये १०४६ आसन व्यवस्था असलेले प्रेक्षागृह वातानुकूलित असून भव्य रंगमंच व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुर्दैवाने वातानुकूलित यंत्रणा अनेकदा नादुरुस्त होत असल्याने कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षागृहामध्ये बसणे अशक्य होते. कोटय़वधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले भव्य स्मारक चांगल्या स्थितीमध्ये राहावे यासाठी शासनाने स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक असून इमारतीमध्ये असलेल्या रिक्त दालनांचा वापर शासकीय कार्यालयांकरिता अथवा बँक वा अन्य संस्थांकरिता केल्यास उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. तसेच तरणतलाव सुरू करावा, अशी मागणी महाडकर नागरिकांनी अनेकदा केली आहे, परंतु त्याकडेदेखील दुर्लक्ष केले जात आहे. स्मारकाची देखभाल व योग्य वापर झाल्यास इमारत चांगल्या परिस्थितीमध्ये राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2013 4:11 am

Web Title: bad condition of dr ambedkar national smarak wich is in mahad
Next Stories
1 गिरणी कामगारांसाठी दबावगट निर्माण करणार – आ. केसरकर
2 तटरक्षक दलातर्फे रत्नागिरीत सुरक्षा सप्ताह
3 आंबा खोऱ्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा सत्याग्रह
Just Now!
X