अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणारा आपत्कालीन रस्ता खड्डेग्रस्त; उत्तरदायित्वाचा मुद्दा अधांतरीच

हेमेंद्र पाटील, लोकसत्ता

बोईसर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या बोईसर-तारापूर रस्ता चित्रालय ते पास्थळदरम्यान खड्डय़ांनी भरला आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती-देखभालीसाठी वर्षभरासाठी (अ‍ॅन्युइटी) अदा करण्यात आलेल्या निधीचा अर्थात तैनातीचा नियम धाब्यावर बसवला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी येथील रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने अणुऊर्जा प्रकल्पाच्या आपत्कालीन मार्गावरून वाहतूक करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हा रस्ता तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अणुऊर्जा प्रकल्पाच्या कामगार वसाहत याच भागात असल्याने हा भाग दिवसभर गजबजलेला असतो. मात्र तरीही याभागातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. टाळेबंदी बोईसर-तारापूर मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण व काही भागांत काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तरीही चित्रालय या भागातील रस्त्याचे काम हाती घेतलेले नाही.

बोईसर-तारापूर रस्त्यावर रस्त्यांचे रुंदीकरण करून बांधकाम करताना ज्या भागात पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात खड्डे पडतात त्या ठिकाणी काम करणे अपेक्षित होते. मात्र जे रस्ते चांगल्या स्थितीत होते त्याच ठिकाणी रस्ते बांधकाम सुरू  केल्याने पास्थळ गाव ते चित्रालय भागातील रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. टी. बडे यांनी १० सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रतिक्रियेत या रस्त्याचे काम दहा दिवसांत सुरू केले जाईल, असे सांगण्यात आले होते.  मात्र दीड महिना उलटूनही या रस्त्यांचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग काम करण्यासाठी असमर्थ ठरलेल्या ठेके दारावर कोणत्याही प्रकारची कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाहनचालकांच्या खिशावर भार

राष्ट्रीय रस्ते निर्मितीअंतर्गत पालघर जिल्ह्यत अनेक भागांचे काम हाती घेण्यात आले असून १२५ कोटींचा ठेका देण्यात आला आहे. याच प्रकल्पांतर्गत बोईसर-तारापूर रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र स्थानिक पातळीवर अनेक ठेकेदारांना काम दिल्याने निकृष्ट काम केले जात असल्याचे गेल्या काही दिवसांत समोर आले होते. रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे  वेगवान वाहने खड्डय़ांत जाऊन आदळतात. यात हलक्या वाहनांचे नुकसान होते. या भागातून  रेल्वे स्थानक परिसर आणि तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात जाण्यासाठी हा मुख्य आणि नागरिकांच्या सोयीचा रस्ता असल्याने नागरिकांना खड्डय़ांतून मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे वाहनचालकांना वाहनांच्या दुरुस्तीसाठी खर्च करावा लागत आहे.

केवळ खर्च, दर्जाचे काय?

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पालघर विभागातील चार प्रमुख रस्ते विशेष रस्ता प्रकल्प अर्थात हायब्रिड अ‍ॅन्युइटी प्रकल्पांतर्गत  २०१८ मध्ये देण्यात आले आहेत. मे. जीएचवी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांनी या प्रकल्पाचा ठेका २८ फेब्रुवारी २०१९ रोजी स्वीकारला. या प्रकल्पाचे मे. पालघर रोड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडला रस्ते कामाची जबाबदारी सोपवण्यात आली. या अंतर्गत चिंचणी-आशागड- उधवा या ३४.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ९१ कोटी, परनाळी-बोईसर-उमरोळी- कोळगाव या १४.९० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ३५ कोटी, सफाळे मांडे-टेंभीखोडावे या ९.१० किलोमीटर रस्त्यांसाठी २० कोटी, तसेच नंडोरे-कल्लाळे-मान या ९.२० किलोमीटर त्यासाठी २२ कोटी रुपये खर्चाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण मजबुतीकरण तसेच पुढील दहा वर्षांनी देखभाल दुरुस्ती करणे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.