12 August 2020

News Flash

मालेगावात अन्य आजारांच्या रुग्णांचे हाल

उपचारास नकार देण्याच्या डॉक्टरांच्या या कृतीमुळे शहरातील मृत्युदर अडीच पटीने वाढल्याची जाणीव झाली

(संग्रहित छायाचित्र)

प्रल्हाद बोरसे, लोकसत्ता

मालेगाव : करोनाच्या धास्तीने उपचार नाकारण्याच्या शहरातील खासगी डॉक्टरांच्या सरसकट धोरणामुळे इतर आजारांच्या रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. उपचारास नकार देण्याच्या डॉक्टरांच्या या कृतीमुळे शहरातील मृत्युदर अडीच पटीने वाढल्याची जाणीव झाली, तेव्हा मालेगावात आलेल्या आरोग्यमंत्र्यांनीच या डॉक्टरांना तंबी दिली; परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला नसून अद्यापही इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांची गैरसोय सुरूच असल्याचे दिसत आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात शहरात करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर शहरवासीयांनी धसका घेणे साहजिक आहे; परंतु रुग्णांच्या लेखी ज्यांना ‘देवत्व’ बहाल केले जाते, त्या डॉक्टरांनी भीतीपोटी सर्वच रुग्णांना करोना संशयित समजून उपचार करणे टाळले. उपचाराअभावी इतर आजाराच्या रुग्णांचा चालताबोलता कसा मृत्यू झाला, याच्या एकेक कथा आता उघड होत आहेत.

उपचाराअभावी माजी महापौरांचा मृत्यू

माजी महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम यांचे १ मे रोजी निधन झाले. पहाटे ४ च्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. श्वसनाचा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; परंतु कोणीच दाद दिली नाही. खासगी डॉक्टरांच्या मिनतवाऱ्या करण्यात दीड तास गेला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना नाइलाजास्तव करोना रुग्णांसाठी व्यवस्था असलेल्या जीवन रुग्णालयात नेले. आधीपासून रक्तदाबाचा त्रास असलेले ६२ वर्षांचे माजी महापौर तेव्हा आपल्या गाडीतून उतरत रुग्णालयात चालत गेले; पण तेथे गेल्यावर अर्ध्या तासातच त्यांचा मृत्यू झाला. कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज असताना तो वेळेवर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची नातेवाईकांची तक्रार आहे. याच दिवशी ५० वर्षांचे माजी नगरसेवक तन्वीर उस्मानी यांचाही मृत्यू झाला. तापामुळे दुपारी ते एका खासगी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी उपचार करून अर्ध्या तासात बळजबरीने घरी पाठवून दिले. सायंकाळी जास्त त्रास होऊ  लागल्याने ते पुन्हा त्याच रुग्णालयात गेले. मात्र डॉक्टरांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. तन्वीर यांचे डॉक्टर असलेले मुंबईस्थित भाऊ  अखलाक उस्मानी यांना ही बाब समजल्यावर त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे डॉक्टरांची विनवणी केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेरीस त्यांनाही जीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने जीवन रुग्णालयात गेल्यावर अर्ध्या तासात रुग्णाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्यूनंतर तीन दिवसांनी त्यांना करोनाचा संसर्ग नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या किमान १० महिलांना आणि त्यांच्या बाळांनाही अशाच प्रकारे जीव गमवावा लागल्याचे समजते.

करोनाने ४०, अन्य आजारांचे ११६० बळी

आजवर करोनामुळे शहरात ४० जणांचा मृत्यू झाल्याची सरकारी आकडेवारी आहे; परंतु पावणेदोन महिन्यांत शहरातील इतर आजारांनी मृत्यू झालेल्यांसह एकूण मृतांची संख्या १२००च्या आसपास पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीशी तुलना केली असता मृत्यूचे आताचे प्रमाण हे अडीच पटीने अधिक असल्याचे अधोरेखित होत आहे. मृत्यूचे वाढलेले हे प्रमाण करोनाच्या धास्तीने शहरातील बहुतांश रुग्णालये बंद असल्याने किंवा रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड, हृदयविकार यांसारख्या अन्य आजाराच्या रुग्णांना उपचार नाकारण्याच्या खासगी डॉक्टरांच्या धोरणाचा परिपाक असल्याची ओरड काही दिवसांपासून सुरू आहे.

जळगाव जिल्ह्य़ात मृतांची संख्या ४२

जळगाव : जिल्ह्य़ात नव्याने पाच अहवाल सकारात्मक आल्याने करोना बाधितांची एकूण संख्या ३५१ झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा आलेल्या ४९ अहवालांपैकी ४४ अहवाल नकारात्मक आले. तर मृतांचा आकडा ४२ वर गेला आहे. अमळनेर,  जळगाव, पाचोरा,  भडगाव, धरणगाव, जामनेर येथील संशयितांचे हे तपासणी अहवाल होते. सकारात्मक अहवाल आलेल्यांमध्ये जळगावातील दोन, तर अमळनेर, भडगाव, धरणगावातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. धरणगाव आणि सावदा येथील दोन करोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्य़ात आतापयंत ४२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. १७३ करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय आणि रूग्णालयातील तरूणाने करोनावर मात केल्याने त्यास सामान्य रूग्णालयातून रूग्णवाहिकेव्दारे महाविद्यालयात आणण्यात आले. डॉ. उल्हास पाटील महाविद्याल आणि रूग्णालय परिसरात हा तरूण आल्यावर टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून या तरूणाचे स्वागत करण्यात आले.

इतर रुग्णांना  खासगी रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे उपचार दिले जात आहेत; परंतु करोना संशयितांना खासगी रुग्णालयांनी दाखल करू नये असे सरकारचे धोरण आहे. तसेच जोखीम टाळण्यासाठी ६५ वर्षांवरील डॉक्टरांना रुग्ण तपासणी करू नये, असे आयएमएने सांगितले आहे. शहरातील सहा डॉक्टर आतापर्यंत करोनाचे बळी ठरले आहेत.

– डॉ. मयूर शहा, अध्यक्ष, आयएमए मालेगाव शाखा

नुरी टॉवरजवळील झेबा वसीम अहमद या २२ वर्षांच्या विवाहितेला सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. जुळे असल्यामुळे शस्त्रक्रियेची आवश्यकता  होती. त्यानुसार शहरातील चार ते पाच रुग्णालयांना विनंती केली. त्यांनी नकार दिला. अखेरीस दुसऱ्या दिवशी पहाटे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आम्ही तिला घेऊन गेलो. तेथे तपासल्यावर मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आडगाव येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. या दरम्यान अधिक रक्तस्राव झाल्याने या रुग्णालयात पोहोचल्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. 

– झिया उर रहेमान, बालक संरक्षण चळवळीचे कार्यकर्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:37 am

Web Title: bad condition of patients with other diseases in malegaon zws 70
Next Stories
1 मुंबईतील कोकणवासीयांकडे शिवसेनेची पाठ!
2 दुकानांसाठीचा निर्णय मागे
3 खासगी प्रयोगशाळेवर बंदी
Just Now!
X