हर्षद कशाळकर, अलिबाग

गणेशोत्सव अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपला असला तरी यंदाही मुंबईतील चाकरमान्यांचा कोकणातील प्रवास खडतर ठरण्याची चिन्हे आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची मोठय़ा प्रमाणात दुर्दशा, अपूर्ण काम, ठिकठिकाणी देण्यात आलेले बाह्य़वळण रस्ते यामुळे पुन्हा एकदा अडथळ्यांची शर्यत पार करत कोकणात प्रवास करावा लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाला २०११ मध्ये सुरुवात झाली होती. हे काम २१०४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०१९ साल उजाडले तरी हे काम पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर पनवेल येथील सुप्रीम कंपनी आणि इंदापूर टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना या महामार्गाचे कंत्राट देण्यात आले. ९४२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी ठेकेदार कंपनीने स्वखर्चाने रस्त्याची बांधणी करायची होती. मात्र हे काम रखडले.

सुरुवातीला वन आणि पर्यावरण विभागाच्या परवानग्यांसाठी हे काम रखडल्याचे सांगण्यात आले. नंतर भूसंपादनात दिरंगाई झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. यानंतर कंत्राटदार कंपन्यांच्या आर्थिक समस्यांवर बोट ठेवण्यात आले. शेवटी पनवेल ते वडखळ या मार्गासाठी नवीन ठेकेदार नेमण्यात आला. यानंतर कामाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अजूनही महामार्गाच्या कामाला अपेक्षित गती मिळू शकलेली नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्याची कामे झाली आहेत, तिथेही रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुर्दशा झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

कर्नाळा खिंड, तारा, जीते, पेण, रामवाडी, उचेडे, वडखळ, गडब, पांडापूर, नागोठणे या परिसरांत महामार्गाची परिस्थिती दयनीय आहे. पुलांची कामे अपूर्ण आहेत. अर्धवट तयार झालेल्या पुलांवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या पुलांवर संरक्षक कठडे अस्तित्वात नाहीत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पेण आणि तारा येथे पुलांची कामे सुरू असल्याने वळण रस्ता तयार करण्यात आला. पण या रस्त्यांची सध्या धूळधाण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी महामार्गावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे वाहतूक समस्येत अधिकच भर पडत आहे.

वडखळ ते नागोठणे, सुकेळी खिंड, कोलाड या पट्टय़ातही रस्त्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. इंदापूर ते पोलादपूर दरम्यान ज्या ठिकाणी बाह्य़वळण रस्ते बांधण्यात आले आहेत, ते धोकादायक आहेत. कशेडी घाट अतिवृष्टीने अडीच फूट खचला आहे. या ठिकाणी धिम्या गतीने वाहतुक केली जात आहे. त्यामुळे यंदाही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. त्यांचा प्रवास अतिशय खडतर ठरण्याची शक्यता आहे.

अर्धवट पूल वाहतुकीसाठी खुले

मुंबई-गोवा महामार्गावर जीते, पेण आणि रामवाडी येथील अपूर्ण अवस्थेत असलेले पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. या पुलांवरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. पुलांवरील रस्ते नादुरुस्त आहेत. शिवाय पुलांना संरक्षक कठडे अस्तित्वात नाहीत. पेणजवळ एका पुलाची भिंतच कलंडली आहे. त्यामुळे अतिशय धोकादायक परिस्थिती या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. वडखळ येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महामार्गावर उचेडे ते वडखळ दरम्यान बाह्य़वळण रस्ता देण्यात आला आहे. या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे. वडखळ येथील उड्डाण पुलाचे काम अपूर्ण असताना त्या पुलावरील चारपैकी दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र बाह्य़वळण रस्ता उचेडे येथे महामार्गाला जोडला जातो येथील काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

रायकीय पक्षांचे मौनव्रत

गेली आठ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रस्त्याची दुरवस्था असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र जिल्ह्य़ातील एकही राजकीय पक्ष यावर आवाज उठविण्यास तयार नाही. महामार्गाचे सध्या काम करणारे ठेकेदार हे जिल्ह्य़ातील एका बडय़ा राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपसकट सर्वच पक्ष रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मौनव्रत धारण करून आहेत.

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक व्यवस्था आणि महामार्गाची परिस्थिती याचा नुकताच आढावा घेतला. महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश महामार्ग प्राधिकरण आणि संबधित ठेकेदारांना दिले आहेत. पेण ते वडखळ येथे नादुरुस्त रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी महामार्ग दुरुस्त केला जाईल.

 –  डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड</strong>