मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री, काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रेमलाकाकी चव्हाण व माजी केंद्रीयमंत्री डी. आर. तथा आनंदराव चव्हाण या दाम्पत्याच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीमती प्रेमलाताई चव्हाण मेमोरियल प्रथम राज्यस्तरीय ज्युनिअर निवड बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती स्पध्रेचे संयोजक व श्रीमती प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे विश्वास देसवंडीकर, श्रीकांत यारगोप, अजित देशपांडे, विनय जोशी, नीलेश फणसळकर उपस्थित होते.
राहुल चव्हाण म्हणाले, की या भव्य स्पध्रेचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होत आहे.
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या या स्पध्रेसाठी आंतरराष्ट्रीयस्तरावरील नियोजन असून, हुवा कोर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे. एका वर्षांत निवड चाचणी स्पर्धा तीन वेळा होत असतात. त्यापैकी ही सर्वप्रथम स्पर्धा आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळू इच्छिणा-या बॅडमिंटनपटूंना खेळणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय ज्युनिअर निवड बॅडमिंटन स्पध्रेसाठी सलग दुस-या वर्षी हुवा कोर्ट उपलब्ध असून, येत्या ४ ते ८ जुलै या पाच दिवस चालणा-या स्पध्रेत १७ ते १९ वयोगटाखालील खेळाडूंना हुवा कोर्टवर खेळण्याचा आनंद मिळणार आहे. चारशे पुरुष व महिला खेळाडूंनी नावनोंदणी झाली असून, या स्पर्धा सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत रंगणार आहेत. नीलेश फणसळकर यांच्याबरोबर जावेद शेख, अतुल पाटील, राजेश चव्हाण, सुनील बरिदे, राजेंद्र जोशी, वैभव अंबिके हे स्पर्धा यशस्वीतेसाठी कार्यरत असल्याचे राहुल चव्हाण यांनी सांगितले.