18 January 2021

News Flash

बडनेरा रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्प रखडला

प्रशासकीय दिरंगाई अन् राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

(संग्रहित छायाचित्र)

मोहन अटाळकर

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्पाचे काम गेल्या दशकभरापासून रखडले असून गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये किमान एक शेड पूर्णत्वास नेण्याचे नियोजन होते, ते पूर्णपणे कोलमडून गेले आहे. हा प्रकल्प के व्हा पूर्ण होईल, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

बडनेरा येथे २४७ कोटी रुपये खर्चून रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना उभारण्यात येणार असल्याची घोषणा २०१० च्या रेल्वे अंदाजपत्रकात करण्यात आली होती. त्यावेळी जाहीर झालेले अनेक प्रकल्प मार्गी लागले. भूमिपूजन झाल्यानंतर दोनच वर्षांत लातूर येथील रेल्वे कोच कारखान्यातून उत्पादन सुरू झाले. पण, बडनेराच्या प्रकल्पाच्या मार्गात सुरुवातीपासूनच अडथळे आले, अजूनही ते दूर झालेले नाहीत.

१९६ एकरवर प्रकल्प

या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी देखील बराच कालावधी लागला. उत्तमसरा मार्गावर एकूण १९६ एकर जागेवर हा प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पासाठी मौजे टाकळी, बडनेरा आणि दुर्गापूर येथील ६४ शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे २३ कु टुंबांनाही विस्थापित व्हावे लागले. यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भाव ठरवताना सुरुवातीला घाई करण्यात आली. अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध दर्शवला होता. दराच्या बाबतीत प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या. पण, त्यातून तोडगा निघण्यास उशीर झाला.  या कारखान्यासाठी लागणाऱ्या जमिनीला ४० लाख रुपये प्रति एकर असे दर लावण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली होती.

दरांबाबत वाटाघाटी करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वेळा बैठका झाल्या, पण त्यातून तोडगा निघू शकला नाही. सुरुवातीला प्रशासनाने सात लाख प्रति एकर दराने जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवला होता. नव्याने वाटाघाटी झाल्या त्यावेळी कोरडवाहू जमिनीसाठी १५ लाख रुपये प्रतिहेक्टर, हंगामी बागायती जमिनीसाठी २२.५० लाख रुपये आणि बारमाही बागायती जमिनीसाठी ३० लाख रुपये देण्याचा प्रस्तावही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नाकारला होता. या प्रकल्पाच्या भूसंपादनात राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचाही आरोप त्यावेळी झाला होता. अखेरीस भूसंपादनासाठी अतिरिक्त निधी मंजूर झाला आणि हा प्रश्न मार्गी लागला.

प्रकल्पात अडथळे

त्यानंतर प्रकल्पाच्या निविदा प्रक्रि येत अडथळे निर्माण झाले. २०१५ मध्ये निविदा मार्गी लागली, त्याआधी हे  प्रकरण न्यायालयात गेले होते. प्रत्यक्ष कामाला २०१७ मध्ये सुरुवात झाली. भूमिपूजनानंतर तब्बल आठ वर्षांनी अखेर प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले.

या प्रकल्पामुळे जिल्ह्य़ाची नवीन ओळख निर्माण होणार असल्याचे आणि स्थानिकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. प्रकल्पाचे काम रेंगाळत गेल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील झाशी येथील वॅगन दुरुस्ती केंद्रातच सर्व कामे केली जातात. या प्रकल्पामुळे नागपूर, भुसावळ आणि मुंबईपर्यंतच्या सर्व रेल्वे गाडय़ांची दुरुस्ती आणि इतर कामे पूर्ण होणार आहेत. प्रकल्पातून प्रत्येक महिन्याला १८० वॅगन दुरुस्त होऊ शकणार आहेत. संपूर्ण बॉडी रिपेअरिंग, बोगी शॉप, व्हील रिपेअरिंग, पेन्ट आणि इन्स्पेक्शन शेड अशी प्रकल्पाची रचना असणार आहे. एका रेल्वे गाडीची दर साडेचार वर्षांनी दुरुस्ती करावी लागते. त्यानुसार सर्व आधुनिक यंत्रसामग्री, तज्ज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने रेल्वे वॅगनची दुरुस्ती आणि देखभाल ही कामे केली जाणार आहेत.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बडनेरा येथे मंजूर झालेल्या या प्रकल्पाच्या मार्गात भूसंपादनाचा मोठा अडसर निर्माण झाल्याने या प्रकल्पाचे काम ठप्प पडून हा प्रकल्प इतरत्र हलवला जाणार काय, अशी भीती वर्तवण्यात येत होती. गेल्या काही वर्षांत मंजूर झालेल्या रेल्वेच्या अनेक प्रकल्पांचे काम सुरू झालेले असताना बडनेरा रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे काम मात्र मागे पडले आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती यावी आणि यात स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी त्यांना आधीच प्रशिक्षित करण्यात यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

२००९ साली भूमिपूजन झालेल्या बडनेरा येथील रेल्वे वॅगन  दुरुस्ती कारखान्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. मार्च २०२० पर्यंत किमान एक शेड  पूर्णत्वास जाऊन त्याचे लोकार्पण करण्याचे नियोजित होते, परंतु अद्याप त्याचा थांगपत्ता नाही. तसेच या प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांकरिता १२८ निवासस्थानांच्या इमारतीचे काम मुंबई येथील कॅनान कंपनीद्वारे बांधकाम सुरू  होते परंतु स्थानिक जनप्रतिनिधींनी त्यामध्ये खोडा घातल्यामुळे ते काम सघ्या बंद आहे व केव्हा सुरू होईल याबाबत अनिश्चितता आहे. या उलट लातूर येथे रेल्वे कोच निर्माण फॅक्टरीचे वर्ष २०१८ मध्ये भूमिपूजन होऊन नुकतेच त्यामधून पहिल्या कोचचे उत्पादन सुरू होऊन लोकार्पणसुद्धा झाले. बडनेरा येथील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करायला हवा.

– डॉ. सुनील देशमुख, माजी राज्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:18 am

Web Title: badnera railway wagon repair project stalled abn 97
Next Stories
1 दळणवळण सुविधांचे ‘उड्डाण’
2 पालघरमधील गणेशकुंड तलावाची ‘कचराकुंडी’
3 जिल्हा प्रशासन ‘संपर्कहीन’
Just Now!
X