कराराची कागदपत्रेही गहाळ ; दोन्ही शहरातील शिष्टमंडळांचे केवळ दौरेच हाती
राज्यात औद्योगिकदृष्टया पिछाडीवर राहिलेल्या सोलापूरचा समावेश केंद्र शासनाने ‘स्मार्ट सिटी’ केला असताना अशाच स्वरूपाची संधी सोलापूरला २५ वर्षांपूर्वी चालून आली होती. चीनमधील सिचा च्वाँग व सोलापूर यांच्यात भगिनी शहराचा करार झाला होता. त्यातून सोलापूरचा विकास होण्याची आलेली नामी संधी सोलापूर महापालिकेच्या उदासीनतेमुळे दवडली गेली आहे. सिचा च्वाँग-सोलापूर भगिनी शहर कराराला केंद्राची मान्यता मिळविण्यासाठी अनास्था दाखविली गेल्यामुळे हा करार गेली २५ वष्रे तसाच धूळ पडून आहे. नव्हे, संबंधित कागदपत्रेही गहाळ झाली आहेत. सोलापूरचे थोर मानवतावादी सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी दुसऱ्या महायुद्धात चीनमध्ये केलेल्या सेवाकार्याची पोचपावती म्हणून सोलापूर व चीनमधील सिचा च्वाँग या दोन शहरांमध्ये भगिनी शहरांचा करार झाला होता. हा करार अमलात आल्यास दोन्ही शहरांमध्ये कला व संस्कृतीबरोबरच उद्योग, व्यापार आणि शिक्षण आदीची अदान प्रदान सुलभरीत्या होणे शक्य होणार आहे. परंतु दोन्ही शहरांची शिष्टमंडळे एकमेकांकडे दौरे केल्याशिवाय पुढे काहीच हाती लागत नसल्याचे दिसून येते.
चीनचे अकरा सदस्यीय शिष्टमंडळ नुकतेच सोलापूरला येऊन गेले. या वेळी सोलापूर महापालिकेने सोलापूर शहराला ‘स्मार्ट सिटी’चे रूपडे मिळण्यासाठी चीनकडून मदतीची अपेक्षा केली. परंतु २५ वर्षांपूर्वी झालेला सिचा च्वाँग-सोलापूर यांच्यात भगिनी शहरे म्हणून झालेल्या कराराला केंद्र सरकारकडून मान्यता मिळण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता त्यात कमालीची उदासीनता दाखविण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांची शिष्टमंडळे परस्परांच्या भेटीसाठी आली-गेली तरी त्याचे कोणतेही दृश्यपरिणाम दिसून येणे केवळ अशक्य आहे. ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षांने समोर आली आहे. सोलापूर महापालिकेकडे गांभीर्य व इच्छाशक्तीचा अभाव आणि डॉ. कोटणीस यांच्याविषयी लोप पावत असलेली आत्मीयता यामुळे डॉ. कोटणीस यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या सोलापूर व सिचा च्वाँग या दोन्ही शहरांतील भगिनी शहरे म्हणून झालेल्या कराराला मूर्त स्वरूप लाभणे दुरापास्त ठरल्याचे सत्य पुढे आले आहे.
१९८७ साली डॉ. कोटणीस यांच्या जन्मगावी-सोलापूरला सिचा च्वाँगच्या तत्कालीन महापौरांसह चिनी शिष्टमंडळाने भेट दिली आणि सोलापूर महापालिकेच्या तत्कालीन महापौरांना चीन भेटीचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर तत्कालीन महापौर बंडप्पा मुनाळे यांच्या नेतृत्वाखाली रंगा वैद्य, धर्मण्णा सादूल, रवी मोकाशी, किशोर देशपांडे, डॉ. मंजिरी चितळे आदींचे शिष्टमंडळ चीन भेटीवर गेले. नंतर १९९०-९१ साली मुरलीधर पात्रे हे महापौर असताना सिचा च्वाँगच्या महापौरांच्या शिष्टमंडळाने सोलापूरला भेट देऊन सोलापूर व सिचा च्वाँग या दोन्ही शहरांमध्ये भगिनी शहरांचा करार केला होता. या करारात प्रामुख्याने दोन्ही शहरांमध्ये कला व संस्कृतीसह उद्योग, व्यापार तथा शिक्षण या बाबींची देवाणघेवाण करण्याचे ठरले होते. या कराराला मान्यता देण्यासाठी चीन सरकारची कोणतीही आडकाठी नव्हती. केवळ भारत सरकारकडून मान्यता मिळणे अपेक्षित होते. त्यानंतर दोन्ही देशांची म्हणजे सोलापूर व सिचा च्वाँग या दोन्हीकडील शिष्टमंडळे एकमेकांना भेटली व पुन पुन्हा भगिनी शहरांच्या कराराची पूर्तता होण्यासाठी चर्चा कायम ठेवली. सिचा च्वाँगच्या महापौरांनी वारंवार पत्रव्यवहार केला. प्रत्यक्षात सोलापूर महापालिकेने त्याबाबत गांभीर्य न दाखविता उदासीनता प्रकट केली. केंद्र सरकारमध्ये सुशीलकुमार िशदे यांच्यासारखे मातब्बर मंत्री असताना त्यांच्याकडे योग्य प्रकारे पाठपुरावा झाला असता तर भगिनी शहर कराराला मूर्त स्वरूप येऊन सोलापूरचे रूपडे पालटले असते. परंतु सोलापूर महापालिका कमालीची उदासीन ठरली, अशी खंत डॉ. कोटणीस स्मारक समितीचे सदस्य रवी मोकाशी यांनी व्यक्त केली.
सिचा च्वाँग-सोलापूर भगिनी शहर करार अमलात आल्यास सोलापुरातील यंत्रमाग उद्योगाला ‘अच्छे दिन’ येऊ शकतात. स्वयंचलित यंत्रमाग चीनमधून आयात होतात. हे यंत्रमाग करमुक्त दरात उपलब्ध होऊ शकतात. सोलापूरचे टेरि टॉवेल, चादरी तसेच डािळब, द्राक्षे, बोर, चिक्कू यासारख्या फळांची चीनला निर्यात होऊ शकते.