13 November 2019

News Flash

नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा बविआचा आरोप

पैसे वाटण्यासाठी आल्याचा आरोप केल्यामुळे शनिवारी रात्री बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्ते आपापसात भिडल्याने तणाव निर्माण झाला

नालासोपारा विधानसभा मतदारसंघात शनिवारी रात्री बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्ते आपापसात भिडल्याने तणाव निर्माण झाला. निळेमोरे परिसरात रात्री ११ वाजता शर्मा आले असता बविआच्या कार्यकर्त्यांनी ते पैसे वाटण्यासाठी आल्याचा आरोप करत गाड्यांची तपासणी करण्याची मागणी केली. मात्र पोलीस संरक्षणात शर्मा निसटल्याने बविआ कार्यकर्ते संतप्त झाले होते. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

शनिवारी रात्री ११ च्या सुमारास शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा नालासोपाऱ्याच्या निळेमोरे परिसरात आले होते. शनिवारी संध्याकाळी प्रचार संपला तरी इतक्या उशीरा प्रदीप शर्मा वाहनांचा ताफा घेऊन आल्याची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. शर्मा हे मतदारांना पैसे वाटण्यासाठी आल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी करत शर्मा यांचे वाहन तपासण्याची मागणी केली. शर्मा यांचे वाहन पोलीस ठाण्यात नेऊन तपासू असे पोलिसांना सांगितले. मात्र पोलीस संरक्षणात शर्मा घटनास्थळावरून निसटत असल्याने जमाव अधिक संतप्त झाला. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

दरम्यान, प्रदीप शर्मा हे वसईच्या सनसिटी येथील आपल्या बंगल्यात आल्यानंतर तिथे मोठ्या संख्येने दोन्ही बाजूने कार्यकर्ते जमा झाले. सनसिटी येथे जमलेल्या बविआच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी नाकाबंदी करून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

रात्री ११ च्या सुमारास प्रदीप शर्मा एवढ्या वाहनांचा ताफा घेऊन का आले होते? त्यांच्या वाहनात काय होते? ते सुध्दा पोलिसांनी तपासू दिले नाही. यामुळे ते पैसे वाटण्यासाठी आले होते का असा संशय निर्माण झाला आहे, असा आरोप बविआचे नेते उमेश नाईक यांनी केला. तर बविआचे आरोप खोट असून एका घरात पुजेसाठी गेलेल्या शर्मा यांची गाडी अडवून बविआच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आऱोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे यांनी केला आहे.

बविआ कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असून त्याचे पडसाद रविवारी उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शर्मा यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडण्या आल्या. त्यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले.

First Published on October 20, 2019 3:26 am

Web Title: bahujan vikas aghadi accused pradeep sharma of sharing money in nalasopara abn 97