महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्य़ातील आरोपी व माजी आमदार लक्ष्मण माने आणि त्यांना मदत करणाऱ्या मनीषा गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला. यामुळे या गंभीर गुन्ह्य़ात गेले आठ दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या माने यांना अटक करण्याच्या मार्गातील कायदेशीर अडथळा दूर झाला आहे.
माने यांच्याविरुद्ध त्यांच्याच शारदाबाई पवार आश्रमशाळा या संस्थेत काम करणाऱ्या पाच महिलांनी गेल्या आठवडय़ात लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत गुन्हे दाखल होऊन एक आठवडा उलटला तरी माने पोलिसांना गुंगारा देत आहेत. दरम्यान, माने यांनी सोमवारी सातारा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त न्यायाधीश कुलकर्णी यांनी फेटाळून लावला. तसेच या तपासाबाबत पोलिसांना आपले म्हणणे ६ एप्रिल रोजी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, लक्ष्मण माने यांच्या शोधार्थ पोलिसांनी चार पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.