सिंधुदुर्गनगरीमधील डंपर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याप्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना गुरुवारी ओरोसमधील न्यायालयाने सात हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यांच्यासह या प्रकरणात अटकेत असलेल्या ३८ जणांनाही आज जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, डंपर आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर आंदोलन मागे घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
डंपर मालकांनी गेल्या शनिवारी सकाळपासूनच त्यांच्या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईचा त्रास होत असल्याचे सांगत डंपर मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दुपारच्या सुमारास सर्व डंपर मालकांचा जमाव नितेश राणेंच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून हा सर्व जमाव आत शिरला. यानंतर या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या आमदार निलेश राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने काँग्रेस आमदार नितेश राणे यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्यासह इतरांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.