प्रतीकात्मकरित्या आणि नियमांचं पालन करुन बकरी ईद साजरी व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मागील चार महिन्यांमध्ये आपण सर्वधर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे करतो आहे. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईदही साधेपणाने, कुठेही गर्दी न करता जमल्यास प्रतीकात्मक पद्धतीने साजरी करावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक झाली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग होता. आजच काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. ज्या पत्रात गणेशोत्सवाप्रमाणेच बकरी ईद साजरी करण्यासाठी संमती देण्यात यावी. निर्देशांचं पालन करुन मुस्लीम बांधवांना ईद साजरी करण्याची संमती द्यावी अशी मागणी करणारं पत्र लिहिलं होतं.

मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे नेतेही बकरी ईद साजरी करण्यासाठी संमती द्यावी अशी मागणी करत होते. याच अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत बकरी ईद साधेपणाने आणि नियमांचं पालन करुन साजरी केली जावी. गर्दी करण्यात येऊ नये अशी इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.