महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ वा वार्धापन दिन सोहळा आज नवी मुंबईमध्ये पार पडला. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनसेचा मेळावा मुंबईबाहेर म्हणजेच नवी मुंबईमधील विष्णुदास भावे नाटयगृहात आयोजित करण्यात आला होता.  या सोहळ्यामध्ये मनसे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटमधील नेत्यांची नावं जाहीर केली. त्याआगोदर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भाषण केलं. यामध्ये त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक करताना, “राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक देखील धारधार कामगिरी करूया” असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.

नवी मुंबईमधील मनसेच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बाळा नांदगावकर यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे

  • गेल्या १४ वर्षात पक्षाला वाढवण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांने खूप मेहनत घेतली, ह्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाच मनापासून अभिनंदन
  • २३ जानेवारी २०२० रोजी मुंबईत पक्षाचं जे पहिलं राज्यव्यापी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाच्या नियोजनात आणि त्यांनतरच्या मोर्च्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन
  • येत्या एप्रिल मध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊया
  • राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक देखील धारधार कामगिरी करूया

आणखी वाचा- वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना – राज ठाकरे

या सोहळ्यामध्ये शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचे काम कसे चालते यावर देखरेख ठेवण्यासाठी मनसेने प्रत्येक खात्यावर काही नेत्यांची नेमणूक केली आहे. संबंधित खात्याचे मंत्री योग्य पद्धतीने कारभार करत आहेत की नाही यावर शॅडो कॅबिनेटमधील मनसेचे नेते लक्ष ठेवणार आहेत.