पनवेलच्या बालग्राममधील धक्कादायक प्रकार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

खांदेश्वर वसाहतीमधील बालग्राम आश्रमातील एका बालिकेवर याच आश्रमाचे नियंत्रकाचे काम करणाऱ्या सहायक अधीक्षकाने बलात्कार केल्याची घटना बुधवारी खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. उत्तम घुमे (वय ५२) असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.  घुमे याच्याविरोधात बलात्कार आणि बालक लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराच्या या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा पनवेलमध्ये आश्रमातील मुलांच्या सूरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पनवेलमध्ये झालेल्या कल्याणी आश्रमातील दिव्यांग मुलींच्या वासनाकांडाने पनवेलच्या सामाजिक कार्याला काळी ओळख दिली आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सुनावली. त्यामुळे पनवेलमधील बालग्राम आश्रमातील बलात्काराच्या घटनेमुळे सर्वांचे लक्ष्य पुन्हा एकदा वेधले आहे. २००२ सालापासून खांदेश्वर वसाहतीतील सीकेटी महाविद्यालयासमोर हे बालग्राम आश्रम सुरू आहे.

पुनर्वसनासाठी या आश्रमात मुली आणि मुले वास्तव्यास आहेत. या आश्रमातील पीडित मुलगी ही माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ही बालिका भेदरल्या अवस्थेमध्ये आढळली. या घटनेची वाच्यता होऊ नये यासाठी घुमे याने तिला धमकावल्याने या बालिकेने सुरूवातीला याबाबत वाच्यता केली नाही. त्यानंतर या बालिकेच्या वर्तनात झालेल्या बदलामुळे या बालिकेच्या वर्गमित्राने तीला धीर दिल्यावर तिने याबाबत त्याला पहिल्यांदा माहिती दिली.

त्याचदरम्यान ही घटना पहिल्यांदा पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांना कळाली. पोलीसांनी या संवदेनशील प्रकरणाची गुप्तता बाळगत या प्रकरणाचा शोध सुरू केला. अखेर बालग्राम आश्रमातील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फुटली. पहिल्यांदा या पीडीत बालिकेला घुमे याने स्वत: खोलीत बोलावून तिच्यावर बलात्कार केला.

पनवेल शहर व खांदेश्वर पोलीस या प्रकरणाचा पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत होते. मंगळवारी रात्री पोलीस आपल्या पाळतीवर असल्याचे समजल्यावर घुमे याला समजल्यावर तो फरार होण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी त्याला पकडले. घुमे सध्या  अटकेत आहे.ह्ण

आश्रमात १५ मुली

आश्रमात २० मुलांना राहण्यासाठी जागा आहे. सध्या येथे १५ मुली आणि ८ मुले राहतात. अधीक्षकांसह दोन महिला गृहमाता आणि इतर कर्मचारी असा येथे कर्मचारी वर्ग आहे.