दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी अफगाणिस्तानात जाणाऱ्या दोघांना सिकंदराबाद येथे बुधवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. यातील एक शोएब रहेमान खाँ हा इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित असून हिंगोली जिल्ह्य़ातील आखाडा बाळापूरचा असल्याची माहिती चौकशीतून समोर आली. त्यामुळे दहशतवाद्यांचे कनेक्शन आखाडा बाळापूपर्यंत जोडले गेल्याचे निष्पन्न झाले.
सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर पोलिसांनी बुधवारी रात्री या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. या दोघांच्या झडतीत काही आक्षेपार्ह मजकूर असलेल्या सीडी व अन्य साहित्य पोलिसांना मिळून आले. या दोघांपैकी शोएब हा हिंगोली जिल्ह्य़ातील असल्याचे समोर आल्यानंतर तेथील पोलिसांनी हिंगोली पोलिसांशी संपर्क साधला.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोएब याचे वडील रहेमान खाँ हे आखाडा बाळापूर येथील पाटबंधारे वसाहतीत ४ वर्षांपासून सेवक म्हणून काम करतात. यापूर्वी ते ईसापूर धरण येथे कामाला होते. शोएब हा अकरावी उत्तीर्ण झाला असून, त्याला दोन भाऊ व बहिणी आहेत. यातील दोन आखाडा बाळापूरला काम करतात, तर शोएब हा हिंगोलीत बांधकाम कंपनीत कामाला होता. तो आखाडा बाळापूरहून हिंगोलीस दररोज ये-जा करीत असे.