राज्याच्या राजकारणातील चार महत्त्वाचे नेते आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटचे स्नेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत चार नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं राजकीय जुगलबंदी रंगण्याची चिन्हं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला. या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे.

मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी पालिकेत शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. मात्र हा पुतळा शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात की, शिवाजी पार्क परिसरात उभारायचा यावरून शिवसेनेमध्ये मतभेद होते.

याच काळात जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे पुतळा उभारण्याचे निश्चित झाले. परंतु हा प्रस्तावही बारगळला. अखेर गेट वे ऑफ इंडिया येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटात हा पुतळा उभारण्याचे ठरवण्यात आले. तसा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व अन्य आदी उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray jayanti maharashtra politics uddhav thackeray sharad pawar fadnavis raj thackeray bmh
First published on: 23-01-2021 at 09:02 IST