राज्याची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. १९९० च्या सुमारास एखाद्या व्यक्तीने चार चाकी गाडी घेतली की, त्या व्यक्तीला लगेच धमकी दिली जायची. त्यामुळे अनेक व्यवसायिक आणि सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सर्व गुंडांचा बंदोबस्त केला असे शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते पुण्यात आयोजित रोजगार मेळाव्यात बोलत होते.

पुण्यातील उरुळी देवाची येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.या कार्यक्रमास उद्योगमंत्री सुभाष देसाई,पालकमंत्री गिरीश बापट व राज्यमंत्री विजय शिवतरे, पुणे महानगरपालिकेतील गटनेते संजय संजय भोसले यांच्यासह आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील टोळया संपल्याने मुंबईमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले आणि टाटा, बिर्ला, अंबानी या सारखे अनेक उद्योजक मुंबईमध्ये व्यवसाय करीत आहेत असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, अनेक तरुणांना नोकऱ्या हव्यात तर अनेकांना स्वयंरोजगार हवा आहे. मात्र, तुम्ही कोणतेही काम आवडीने करा. त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. त्याच बरोबर मी तुमच्या सोबतच आहे. तुमच्यासाठीच लढतोय, झगडतोय. फक्त तुम्ही जिद्द सोडू नका.भविष्यात तुमच्यामधील अनेक तरुण विविध पदावर काम देखील करतील. यात एखादा जिद्दीच्या जोरावर देशाचा पंतप्रधानही होईल.त्यामुळे जिद्द सोडू नका अशा शब्दात त्यांनी तरुणवर्गाला मार्गदर्शन केले.