मुख्यमंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेल्या वादाची धूळ अजूनही खाली बसलेली नाही. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांनी थेट राज्यपालांच सवाल केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभार असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं आहे का?,” असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

‘‘हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात?’’ असा सवाल राज्यपालांनी केला. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठामपणे उत्तर दिलं. ‘‘तुम्हाला घटनेतील धर्मनिरपेक्षता मान्य नाही का? माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,” असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

आणखी वाचा- राज्यपालांनी यात हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा कळत नाही – जितेंद्र आव्हाड

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रावरून बाळासाहेब थोरात यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली, तर मंदिरं बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांच्या या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का? राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?,” असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- “राज्यपालांची पत्रातील भाषा वाचून…”; शरद पवारांनी थेट मोदींना लिहिलं पत्र

शरद पवारांनीही व्यक्त केली होती नाराजी

“सध्या आपण सर्वजण करोना संकटाशी लढत आहोत. करोनाला रोखण्यासाठी तुम्ही अंतर ठेवण्यासंबंधी घोषणा दिली होती. महाराष्ट्रात मुक्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली ‘माझं घर माझं कुटुंब’ मोहीम राबवण्यात आली असून लोकांना सोशल डिस्टन्सिंगबद्दल शिक्षण दिलं जात आहे”. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करताना राज्यात अनेक महत्त्वाची धार्मिकस्थळं असल्याचं म्हटलं आहे. “सिद्धिविनायक, विठ्ठल मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर तसंच इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही. राज्यपालांचं एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत असू शकतं हे मला मान्य आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं मत व्यक्त केलं याचंही कौतुक आहे. पण मीडियामध्ये हे पत्र प्रसिद्ध होणं आणि ज्या प्रकारची भाषा वापरली आहे, ती पाहून आपल्याला धक्का बसला आहे,” असं सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती.