राज्यातील प्राचार्य,प्राध्यापक यांचे सरकारने सेवा निवृत्तीचे वय वाढवू नये अशी मागणी  पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
 विखे पाटील यांनी म्हटले आहे की,राज्यातील प्राचार्य,प्राध्यापक यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे बाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात आल्याचे समजते  सेवा निवृत्तीचे वय वाढविण्यास आपला  विरोध आहे.राज्यातील प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय वाढविल्यामुळे राज्यातील नेट-सेट पात्रता धारकांची बेकारी वाढणार असल्यामुळे प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविण्यात येवू नये. प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविल्यास सुशिक्षीत तरुणांच्या नोकरीच्या संधी कमी होण्याची भीती असून राज्यात दरवर्षी साधारणपणे ६०  ते ७०  हजार विद्यार्थी सेट व  ३० ते ४० हजार विद्यार्थी नेटची परिक्षा देतात.त्यातील साधारण साडे तीन ते चार हजार विद्यार्थी दरवर्षी नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण होत असतात.राज्यात एकीकडे नेट-सेट उत्तीर्ण झालेले हजारो विद्यार्थी बेकार आहेत.त्यात दरवर्षी भर पडत आहे.त्यातच प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ वरुन ६५ केल्यास महाविद्यालयीन शिक्षक होण्यासाठीची पात्रता धारण केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधी कमी होणार आहेत.त्यामुळे प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविण्यात येवू नये.
    सेवेतील अनुभवी प्राचार्य,प्राध्यापक आहे त्या वयातच सेवा निवृत्त झाल्यास त्यांच्या जागेवर सुशिक्षित  तरुणांची भरती होईल.व या अनुभवी प्राचार्य,प्राध्यापकांना इतर क्षेत्रात आपल्या अनुभवाच्या जिवावर सेवा निवृत्तीनंतरही काम मिळू शकते या लोकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे म्हणजे, तरूणांमधील  बेकारी वाढवण्यासारखे  होईल सेवा निवृत्तीचे वय वाढविण्यास विद्यार्थ्यांचाही विरोध आहे.आपण सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय घेवू नये व या निर्णयाचा आपण गांभिर्याने विचार करून राज्यातील सुशिक्षित बेकारांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही विखे पाटील यांनी या निवेदनामध्ये केली आहे.